पिंपरी, दि.२५ सप्टेंबर २०२४ :- उपेक्षितांच्या उत्थानासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाची संकल्पना मांडून आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले, नवोदित पिढीने देखील उपेक्षितांच्या कल्याणासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, दिलीप औटी, विजय बंडवाल यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय दिन म्हणून साजरा करण्यात येते. समाजातील सर्वात शेवटच्या घटकाचा समावेश विकासाच्या मुख्य प्रवाहात होत नाही, तोपर्यंत देशाचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही. या विचाराने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदय संकल्पना मांडून, त्यानुसार आपले जीवन व्यतीत केले आहे. त्यांच्या नावे भारत सरकारने टपाल तिकीट देखील सुरु केले आहे, असे देखील अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यावेळी म्हणाले.


