पुणे,दि.१४ :- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक व्हावी या हेतूने लोकशाही दिन आयोजित करण्यात येऊन नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यात येतात. तथापि, नागरिकांनी चूकीचे अर्ज करुन अथवा आपसातील वैयक्तिक स्वरुपाचे वाद सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग टाळावा अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली.
विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात विभागीय स्तरावरील लोकशाही दिनातील प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा लड्डा ऊंटवाल, नगर पालिका प्रशासन उपायुक्त पूनम मेहता यावेळी उपस्थित होते.
विभागीय लोकशाही दिनामधे दाखल प्रकरणांवर सुनावणी घेऊन दिलेल्या आदेशाचे प्रशासनाने काटेकोरपणे व त्वरित पालन करुन तक्रारी तातडीने सोडवाव्या अन्यथा त्याची गंभीर दखल घेण्यात येईल असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी दिले. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या पाच प्रकरणांवर यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. अर्जदारांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या समस्यांसाठी नागरिकांना विभागीय लोकशाही दिनात यावे लागते हे योग्य नसून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि संबधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या सहभागाने तक्रारी सोडवाव्या असे डॉ.पुलकुंडवार यांनी सांगितले. तसे न केल्यास अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरुन प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेशित करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सूचित केले. यावेळी विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
०००


