*
पुणे, दि. १८: वन्यप्राणी बिबट हल्ला टाळण्यासाठी अतिसंवेदनशील भागातील ग्रामस्थ, शेतकरी, मजूर यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर तालुका परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.
जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर या चार तालुक्यांचा जुन्नर वनविभागात समावेश होतो. अतिसंवेदनशील भागांमध्ये नागरिकांनी शेतात काम करताना एकट्याने न जाता समुहाने तसेच आवाज करत सावधानतापूर्वक कामे करावीत. लहान मुले, वृद्धांना घराच्या बाहेर एकटे सोडू नये तसेच घराबाहेर उघड्यावर झोपू नये, शेतातील एकटी घरे व गोठा याभोवती सौरऊर्जा कुंपण करुन घ्यावे, घराच्या आजूबाजूला व शेत रस्त्याला दोहोबाजूचे गवत व झुडुपे काढून परिसर स्वच्छ ठेवावा, दिवस उगवण्यापूर्वी व दिवस मावळल्यानंतर शक्यतो घराबाहेर पडू नये, अपरिहार्य असल्यास सोबत विजेरी (टॉर्च) व मोठी काठी बाळगावी. घराजवळ रात्रीच्या वेळी मोठे प्रकाशदिवे लावावेत, अशा सूचना वनविभागाने दिल्या आहेत.
बिबट हल्ला टाळण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार वनक्षेत्रामध्ये अधिवास उपलब्धततेच्या अनुषंगाने वन्यजीवांच्या निर्धारित संख्येपेक्षा जास्त असणाऱ्या बिबट्यांच्या नसबंदीबाबतचा, तसेच जास्तीच्या ७५ बिबट्यांचे दूरच्या अभयारण्यात स्थलांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे. नुकतेच जुलै २०२४ मध्ये संघर्षक्षेत्रातील १० बिबट्यांचे स्थलांतर जामनगर (गुजरात) येथील बचाव केंद्रात करण्यात आले.
अतिसंवेदनशील भागांमध्ये बिबट्यांमुळे सतत उद्भवणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक तरुणांच्या सहभागातून बिबट कृती दलाचे चार बेस कॅम्प निर्माण करण्यात आले आहेत. हे बेस कॅम्पच्या बचाव दलातील सदस्य तसेच संबंधित अधिकारी, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संवेदनशील भागांमध्ये नियमीत रात्रगस्त करणे, मोठ्या प्रमाणात सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती तसेच आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जुन्नर वनविभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफिशियल इंटेलिजन्स- ए.आय.) या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांना वन्यप्राणी बिबट मनुष्यवस्तीजवळ आल्याची माहिती देणारी प्रणाली विकसित केली आहे. विद्या प्रतिष्ठान बारामती व सिमुसॉफ्ट टेक्नालॉजी, पुणे यांच्या मदतीने शेतात काम करणाऱ्या माणसांच्या सुरक्षेसाठी मानेला लावण्याचा विशिष्ट प्रकारचा काटेरी पट्टा (नेक बेल्ट) विकसित करण्यात आला आहे, तसेच मेंढपाळ वर्गासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने तंबू (टेन्ट) पुरविण्यात येत आहेत. जुन्नर वनविभागांतर्गत वन्यप्राणी बचाव दलाचे बळकटीकरण करण्यात आले असल्याचे वनविभागामार्फत कळविण्यात आले आहे.
0000


