वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या वैभव विजय थोरात ने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले स्थान मिळवले. दोरीच्या उड्या मधील मागील विक्रम मोडीस काढत नवा विक्रम प्रस्थापित केला.
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथील एमबीबीएस च्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या वैभव विजय थोरात यांनी एक उल्लेखनीय कामगिरी करत २०२४ च्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले स्थान मिळवले आहे. वैभव यांनी फक्त ५ मिनिटांत ८८८ दोरीच्या उड्या मारून आधीचा ८६३ उड्यांचा विक्रम मोडला, जो हैदराबादचे श्री. रमेश बाबू यांनी ठेवला होता.
गेल्या ९ वर्षांपासून दोरीच्या उड्या मारण्याचा सराव करत असलेल्या वैभव यांनी सांगितले की, “माझ्या आईने मला २०१५ मध्ये दोरीच्या उड्या शिकवल्या, आणि त्या माझ्या दैनंदिन दिनचर्येचा भाग झाल्या. वैद्यकीय विद्यार्थी म्हणून माझे वेळापत्रक तंग असते, परंतु दोरीच्या उड्या मारणे हा शारीरिक तंदुरुस्त राहण्याचा जलद आणि प्रभावी मार्ग आहे. हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, शारीरिक श्रम करिता सर्वोत्तम व्यायामांपैकी एक आहे आणि ते कोणीही कमी जागेत आणि कमी वेळेत करू शकतात.”
या यशाने वैभवच्या शैक्षणिक कारकिर्दीसोबतच शारीरिक तंदुरुस्तीच्या संतुलनाबद्दलच्या त्याच्या समर्पणाचे दर्शन घडवले, जे दाखवते की साधे व्यायामही एकूण आरोग्याला मोठे योगदान देऊ शकतात.
वैभवला शुभेच्छा देताना डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार डॉ यशराज पाटील म्हणाले “वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आज आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्यातील कौशल्य,कला,खेळ, छंद जोपासत आहेत. ज्ञानसंपादनाबरोबरच कलागुण जपत आहेत याचं अभिमान वाटतो त्याचेच वैभव एक उदाहरण आहे. वैभव च्या या रेकॉर्डमुळे आज तो इतरांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून उदयास आला आहे. त्याच्या या नवकीर्तिमान स्थापनेचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”.


