म्हाडाच्या मोठया सोसायटयांमध्ये तसेच आजूबाजूच्या मतदारांच्या सोईसाठी निवडणूक विभागाने ६ नवीन मतदान केंद्राची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे येथील हजारो मतदारांना येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये मतदान करणे सोईस्कर होणार असल्याचे मत पिंपरी येथील म्हाडा कॉलनीमधील रिव्हरडील इमारतीमधील मतदारांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे निर्देशानुसार आणि २०६, पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांचे मार्गदर्शनाखाली स्वीप उपक्रमांतर्गत कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मोरवाडी, पिंपरी येथील म्हाडाच्या इमारतींमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यावेळी तेथील मतदारांनी नजिकच्या ठिकाणी मतदान केंद्राची स्थापना केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ह्या वेळी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला निवडणुकीच्या फलक घेऊन त्यांनी फोटो देखील काढलेत.
या कार्यक्रमास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, माध्यम समन्वयक विजय भोजने, स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच स्वीप विभागाचे राजेंद्र कानगुडे, दिनेश जगताप, संदीप सोनवणे, महालिंग मुळे तसेच सोसायटीमधील नागरिक उपस्थित होते.
यावेळी सोसायटीतील सदस्यांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. मतदान शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
कोट –
पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये सहा मतदान केंद्रांची नव्याने स्थापना करण्यात आलेली असून त्यामध्ये मोरवाडी, पिंपरी येथील म्हाडा कॉलनीमध्ये त्रिवेणी गृहनिर्माण सोसायटीमध्ये २ तर रिव्हरडील गृहनिर्माण सोसायटीमध्ये २ अशी ४ केंद्रे असून कासारवाडी येथील मंत्री इंटरनिटी गृहनिर्माण सोसायटीमध्ये २ अशा एकूण ६ केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांमुळे तेथील मतदारांना मतदान करणे सोयीस्कर होणार असून त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होणार आहे. – अर्चना यादव, निवडणूक निर्णय अधिकारी


