*
पुणे,दि.१३ : मतदान कर्तव्यावरील तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी १२ नोव्हेंबरपासून थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे कामगार भवन येथे सुरु असलेली टपाली मतदान प्रक्रिया आता १९ नोव्हेंबर पर्यंत सकाळी ९.४५ वाजेपासून ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत ही प्रक्रिया थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.
चिंचवड मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत टपाली मतदान प्रक्रिया सुरु झाली असून आतापर्यंत सुमारे ८५५ अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे. २५ जिल्ह्यांतील ११० विधानसभा मतदारसंघातील मतदारांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यानुषंगाने आत्तापर्यंत १ हजार ८४३ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे, टपाली मतदान कक्ष समन्वय अधिकारी अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली टपाली मतदान प्रक्रिया सुरु आहे.
निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असल्याने प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणे शक्य होत नाही, त्यामुळे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध असते, असे श्री. पवार यांनी सांगितले.


