पुणे,27 नोव्हेंबर 2024 : तरुण तंत्रज्ञांमधील सर्जनशीलता वाढवण्यासाठी 2011 साली स्थापन करण्यात आलेली व ना नफा तत्त्वावर कार्यरत असलेली संस्था गुगल डेव्हलपर ग्रुप (जीडीजी) तर्फे शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 रोजी हॉटेल वेस्टीन येथे डेव्हफेस्ट 2024 च्या 13 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
डेव्हफेस्ट ही गुगल डेव्हलपर ग्रुप्स (जीडीजी) समुदायाद्वारे आयोजित करण्यात येणारी जागतिक तंत्रज्ञान परिषद आहे. प्रत्येक डेवफेस्ट कार्यक्रम हा स्थानिक आयोजकांद्वारे त्यांच्या स्थानिक डेव्हफेस्ट समुदायाच्या गरजा आणि उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी तयार केला जातो,ज्यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण आणि नेटवर्किंगवर विशेष भर देण्यात येतो.
गुगल डेव्हलपर ग्रुप,पुणेचे संयोजक आणि डेव्हफेस्ट पुणेच्या आयोजकांपैकी एक महावीर मुथ्था म्हणाले की, ही तांत्रिक परिषद युवा डेव्हलपर्ससाठी एक सर्वोत्तम व्यासपीठ आहे,यामध्ये संपूर्ण दिवस तज्ञांच्या मार्गदर्शनासह चर्चासत्रे, कार्यशाळा आणि नेटवर्किंग सत्रे असून विविध अनेक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.
जीडीजी पुणेचे सहआयोजक स्वप्नील जठार म्हणाले की, विविध उपक्रमांचा समावेश असलेल्या या फेस्टमध्ये महिला उद्योजकांसह 1000 हून अधिक तरुण तंत्रज्ञ सहभागी होण्याची अपेक्षा आहे.यावर्षीची संकल्पना जनरेटिव्ह एआय आणि कृत्रिम बुध्दिमत्तेचा जबाबदारीने व नैतिकतेने वापर यावर आधारित आहे.
डब्ल्यूटीएम (वुमेन टेकमेकर्स) ,पुणे ॲम्बेसेडर नम्रता मोरे म्हणाल्या की, या फेस्टमध्ये कंपन्या आणि समुदायांसाठी प्रोजेक्ट शोकेस बूथ, गुगल डेव्हलपर ग्रुप्सचा भाग असलेल्या स्थानिक डेव्हलपर्ससाठी करिअर फेअर – एक संधी असणार आहे आणि अनौपचारिक सत्रांसाठी एक समर्पित कम्युनिटी लाउंज असेल ज्यामध्ये साधने, विषय आणि तंत्रज्ञान याबाबत एकत्रित चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
डब्ल्यूटीएम (वुमेन टेकमेकर्स),पुणे ॲम्बेसेडर प्रणोती नंदुरकर म्हणाल्या की, नाविन्यपूर्ण उत्पादन आणि ओपन सोर्स उद्योग क्षेत्रांना कसे पुढे नेऊ शकतात आणि आपल्या सर्वांवर परिणाम करणाऱ्या मोठ्या समस्यांचे निराकरण कसे करू शकतात यावर लक्ष केंद्रित केले जाईल. डेव्हफेस्ट 2024 मध्ये उद्योगक्षेत्रातील 40पेक्षा जास्त तज्ञ 20 पेक्षा जास्त तंत्रज्ञानावर चर्चा करणार आहेत.
महिला टेकमेकर्स ॲम्बेसेडर या जगभरातील असे नेतृत्व आहेत, ज्यांना कार्यक्रम आयोजित करणे, सार्वजनिक ठिकाणी बोलणे, आशय निर्मिती आणि मार्गदर्शन करणे याद्वारे त्यांच्या समुदायाला सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जागतिक समुदायाबरोबर संपर्क आणि अनेक साधनांची उपलब्धता असलेले हे ॲम्बेसेडर्स महिलांना तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदत करत आहे.डेव्हफेस्ट पुणेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला उद्योजक आणि तंत्रज्ञांचा असलेला सहभाग.


