पुणे, ४ डिसेंबर २०२४: अशोक रुईया मेमोरियल हिवाळी राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेत देशभरातील ७०० अव्वल खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून हि स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे ८ ते १८ डिसेंबर २०२४ दरम्यान रंगणार आहे.
६६वी हिवाळी राष्ट्रीय बिज स्पर्धा १५ वर्षांच्या कालावधीनंतर पुण्यात होणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पात्र ठरण्यासाटी महत्वपूर्व गुण मिळवण्याच्या दृष्टीने हि स्पर्धा अ श्रेणीतील स्पर्धा म्हणून गणली जात असते.
स्पर्धेचे पूना रिजन ब्रिज संघटना यांच्या वतीने करण्यात आले असून ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया(बीएफआय), महाराष्ट्र ब्रिज संघटना(एमबीए) यांच्या मान्यतेखाली १० दिवस रंगणार आहे. यामध्ये अमला रुईया कप(महिला जोडी), फिनिक्स कप(मिश्र जोडी), अशोक रुईया वरिष्ठ सांघिक गटात होणार आहे.
हिवाळी राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेतील रुईया गोल्ड कप या महत्वाच्या स्पर्धेबरोबरच रुईया सिल्व्हर कप स्पर्धेस १२ डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. याशिवाय मिलेनियम कप(मॅचपॉईंट पेअर्स), फिनिक्स मार्केट सिटी कप(आयएमपी पेअर्स)यांचा देखील समावेश आहे. स्पर्धेत १० लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या पारितोषिक रकमेशिवाय अन्य विशेष पुरस्कारांचाही समावेश असून त्यात फिनिक्स जीवन गौरव पुरस्कार(५०, ०००रुपये), अशोक रुईया वर्षातील सर्वोत्तम खेळाडू किंवा जोडी पुरस्कार(२५,०००रुपये) आणि अशोक रुईया वर्षातील सर्वोत्तम कुमार खेळाडू किंवा जोडी पुरस्कार (२५,०००रुपये) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अव्वल आशियाई पदक विजेत्या व अव्वल भारतीय खेळाडूंमध्ये जग्गी शिवदासानी, सुमित मुखर्जी, राजीव तोलानी, अजय खरे यांसह अर्जेंटिना येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ब्रिज स्पर्धेतील सुवर्णपदक व कांस्य पदक विजेते अरुण बापट, बिनोद शॉ, संजीत डे, अनिल पाध्ये आणि पुण्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू कौस्तुभ बेंद्रे व अल्का क्षीरसागर यांच्यासह भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश आहे.
ब्रिज या खेळाची जगभरात लोकप्रियता वाढत असून आशियाई स्पर्धेतील तो पदक विजेत्यांसाठी स्पर्धात्मक खेळ ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ब्रिज या खेळाच्या विकासासाठी ब्रिज प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच, सर्व वयोगटातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन राज्य संघटनेने केले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमुळेही युवकांमध्ये खेळाविषयी उत्सुकता वाढेल. मुंबई येथे कुमार गटांसाठी धीरूभाई अंबानी शाळेत पेअर्स ब्रिज स्पर्धेतील तीन जोडयांनी देखील या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे.
हिवाळी राष्ट्रीय २०२४ स्पर्धेला रुईया फॅमिली व फिनिक्स मार्केट सिटी यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.
भारतीय ब्रीज महा संघाचे उपाध्यक्ष केशव सामंत, महाराष्ट्र ब्रिज संघटनेचे सचिव हेमंत पांडे, व खेळाडू प्रतिनिधी अनिल पाध्ये यांनी सांगितले की, हि स्पर्धा एकूण ८ गटांमध्ये होणार असून १०,५०,०००रुपये एकूण पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या संयोजन समितीत आनंद सामंत(बीएफआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष), डॉ. देवेन जोशी(एमबीएचे अध्यक्ष), मिलिंद भडभडे(पीआरबीएचे अध्यक्ष), डॉ. अविनाश देशमुख(पीआरबीएचे उपाध्यक्ष), शिरिष करकरे(संयोजन सचिव), हेमंत पांडे(एमबीएचे सचिव), डॉ. प्रसाद होनप, राजीव देव, सचिन कांगो, अनिल पाध्ये, सतीश कुलकर्णी, अल्का क्षीरसागर, माधव क्षीरसागर, कौस्तुभ बेंद्रे, निरंजन लिमये, आदिती सहस्त्रबुध्दे, मनिषा जमेनीस व अंजली रहाळकर यांचा समावेश असणार आहे.


