पुणे : आपली मुले ही प्रभू श्रीराम आणि शिवाजी महाराज यांच्यासारखी घडायला हवीत, असे आपल्याला वाटते, परंतु ती घडवावी लागतात, त्यांना वेळ द्यावा लागतो. संस्कार केलेली मुले मोबाईलमधून डाऊनलोड होत नाहीत. त्यांच्यावर त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. पालकांनी चांगल्या गोष्टींचा आग्रह मुलांच्या मनात दृढ करायला हवा, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठान माऊली पुरस्कार आणि प्रेरणा पुरस्काराचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले होते. पुरस्कार वितरण समारंभासाठी पिंपरी चिंचवडचे सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ
युवा उद्योजक राहुल पापळ यांच्या मातोश्री आशा पापळ यांना माऊली पुरस्कार, तर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या स्व-रूपवर्धिनी संस्थेला प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्व-रूपवर्धिनीचे कार्यवाह विश्वास कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला.
डाॅ.पराग काळकर म्हणाले, माणूस घडविणारे शिक्षण आणि चांगले कर्म करण्याची प्रेरणा आई देते. घरामध्ये मिळणारे शिक्षण चौकटीबाहेरच्या जगासाठी महत्त्वाचे असते. मुलांच्या मनात पेरलेल्या प्रेरणा मुलांना यशस्वी व्हायला मदत करतात. भारतीय संस्कृती टिकून आहे ती कुटुंब प्रधान संस्कृतीमुळे, हीच एकजूट आपल्याला महाशक्ती बनवायला मदत करेल.
संजय शिंदे म्हणाले, आपल्या आई-वडिलांशी संवाद साधणे यापेक्षा मोठी भावनिक बुद्धिमत्ता कोणतीही नाही. या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगातील अनेक लोक यशस्वी झाले आहेत. अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील कौटुंबिक विकासाच्या गाथा समोर येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विश्वास कुलकर्णी म्हणाले, गणेश मंडळे, शिक्षण संस्था, देणगीदार या सगळ्यांनी मिळून स्वरुपवर्धिनी संस्था कार्यरत आहे. विकसित होणे ही नैसर्गिक क्रिया असते, परंतु काही मुलांना विकास करण्यासाठी अडथळे येतात. त्यांना मदतीचा हात देण्याचे काम स्वरुपवर्धिनी करते.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विराज मोहिते कार्याध्यक्ष विक्रांत मोहिते सचिव सारिका खराडे खजिनदार श्रद्धा झंजाड, श्वेता ढमाळ, शितल देशमुख, ॲड. वृषाली जाधव, कृतिका मोहिते, भाग्यश्री मोहिते, शिवाली मोहिते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. श्वेता ढमाळ यांनी प्रास्ताविक केले. विक्रांत मोहिते यांनी आभार मानले.


