डी.एस.के स्कूल (डी.एस.के विश्व, धायरी) येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत, बुधवार दिनांक ११ डिसेंबर २०२४ पासून ‘डी.एस.के करंडक’ आंतर शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये राज्यातील तीस शाळांनी आपला उत्स्फूर्त सहभाग यात नोंदविला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्रमुख पाहुणे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व मानदज् व्याख्याते डॉ. मिलिंद ढमढेरे आणि कॉसमॉस सहकारी बँकेचे संचालक प्राध्यापक नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
अप्रतिम अशा स्वागत नृत्याने क्रायक्रमाची सुरुवात झाली. शाळेतील चिमुकल्यांनी अनेक क्रीडा नृत्य प्रकार करीत कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.लक्षवेधक प्रकार ठरला तो आपापसातील समन्वय दर्शविणारा पिरॅमिड क्रीडा प्रकार त्यानंतर विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारप्राप्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा ,आशा, संघटन आणि एकतेचे प्रतीक असलेल्या मशालीसह मान्यवरांना मानवंदना दिली. त्याचप्रमाणे आत्मविश्वास आणि दृढतेचे प्रतीक असलेल्या स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परेड मधून शिस्त,समानता,समन्वय याचे अप्रतिम दर्शन घडविले. यानंतर खेळातील सांघिक भावनेशी कटिबध्द राहण्याची शपथ घेण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय जयश्री मुळे यांनी खेळातील मूल्य, तत्वे आपल्या वैयक्तिक जीवनात कशा प्रकारे महत्वाची ठरतात याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले.
शाळेच्या अध्यक्षा हेमंती कुलकर्णी यांनी मैदानी खेळाचे महत्त्व, खेळातील सांघिक भावना, नैतिकता याचे जतन करीत जीवनात चैतन्य निर्माण करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली.
त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात खेळाच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा तयार होतो या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बक्षीस समारंभा नंतर प्रत्यक्ष स्पर्धांना सुरुवात झाली. समारंभास शाळेच्या उपाध्यक्षा श्रीमती रमा काळे उपस्थित होत्या.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १०० मीटर धावण्याची स्पर्धा, अडथळ्याची स्पर्धा
त्याच प्रमाणे डॉजबॉल,खो-खो आणि बास्केट बॉल अशा सांघिक स्पर्धा पार पडल्या.
सर्व स्पर्धकांनी खेळांच्या सर्व नियमांचे पालन करीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत खिलाडूवृत्तीचे उत्तम दर्शन घडविले.


