पुस्तकांचे सहाशे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, पुणे बाल चित्रपट महोत्सव, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, लिट फेस्टीव्हल, अशी साहित्याची विविधांगी मेजवानी असलेल्या पुणे महोत्सवाचे आज, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटन होणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत होत आहे. भारतीय भाषांमधील पुस्तकांचे ६०० पेक्षा अधिक स्टॉल, ८० पेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन, लिट फेस्टीव्हल, बाल चित्रपट महोत्सव, शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. यामध्ये पुस्तकांची दालने सकाळी १० ते रात्री १० या वेळेत कार्यरत असतील, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) विश्वस्त राजेश पांडे यांनी दिली.
पुणे पुस्तक महोत्सवात यंदा २० ते २२ डिसेंबर या कालावधीत लिट फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हलमध्ये साधारण २५ पेक्षा अधिक सत्र विविध विषयांवर होणार असून, त्यामध्ये ६० पेक्षा अधिक साहित्यिक, लेखक, विचारवंत, पत्रकार, कवी सहभागी होणार आहे. हे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये होणार असून, पूर्णपणे मोफत राहणार आहेत.
……..
विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम
शालेय विद्यार्थ्यांसाठी १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी आणि दुपारच्या सत्रात कथा लिहिणे, चित्रकला, नृत्य, संगीत, वेदिक गणित अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत दुपारी १२ ते ४ या वेळेत पुणे बाल चित्रपट महोत्सव होणार आहे. त्यामध्येही मुलांना सहभागी होता येईल. हा उपक्रमही पूर्णपणे मोफत राहणार आहे.
…….


