पुणे, १५ डिसेंबर : पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तक प्रदर्शनातील विविध भाषांतील पुस्तकांसह साहित्यिक चर्चांची मेजवानी मिळत आहे. त्याशिवाय हा महोत्सव वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीही ठरत आहे. पोवाड्यापासून ते नव्या काळाच्या अभंग सादरीकरणापर्यंत, चित्रपट गीतांपासून रॉक बँडपर्यंतच्या कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकरांना घेता येणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात पुस्तकांची सहाशेपेक्षा अधिक दालने आहेत. त्यामुळे मनसोक्त पुस्तके खरेदी करण्याची, त्यासोबतच विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या दालनांमुळे खाद्यसफरीची संधी पुणेकरांना मिळत आहे. महोत्सवाला असलेली सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड हा आनंद द्विगुणित करत आहे.
महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात शनिवारी कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या कवितांवर आधारित चांदणे स्मरणाचे – एक काव्यानुभूती या दृकश्राव्य कार्यक्रमाने झाली. रविवारी बैठक अदबी संगम, डिग व्ही आणि ग्लोबल घराना या कार्यक्रमांनाही उत्तम प्रतिसाद लाभला. आज (१६ डिसेंबर) सायंकाळी सहा ते आठ या वेळेत काव्य कलश हा कवितांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर आठ ते नऊ या वेळेत संतांच्या रचनांचे नव्या शैलीतील अभंग रिपोस्ट हे सादरीकरण होणार आहे. आजच्या तरुणांची ही अनोखी शैली लक्षवेधी आहे. मंगळवारी (१७ डिसेंबर) सायंकाळी सहा ते आठ या वेळेत गर्जली मराठी शाहिरी हा कार्यक्रम शाहीर हेमंतराजे मावळे सादर करणार आहे. महाराष्ट्राची पोवाड्याची संस्कृती या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. त्यानंतर आठ ते नऊ या वेळेत युग्म हा बँड त्यांचे सादरीकरण करणार आहे. वेगळ्या पद्धतीच्या रचनांनी या बँडने देशभरात ओळख निर्माण केली आहे. बुधवारी (१८ डिसेंबर) सायंकाळी सहा ते आठ या वेळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. त्यात नृत्य, संगीताचा समावेश आहे. त्यानंतर आठ ते नऊ या वेळेत स्पेस वॉक ओडिसी या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. गुरुवारी (१९ डिसेंबर) सायंकाळी सहा ते आठ या वेळेत लोकसंगीताचे फ्युजन असलेला कार्यक्रम नागालँडमधील युवा कलाकार इम्ना यादेन आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. त्यानंतर पंजाबी गायिका हरगुन कौर यांचा कार्यक्रम आठ ते नऊ या वेळेत रंगणार आहे. लोकसंगीत आणि आधुनिक शैली यांचा मेळ घालून रचलेले फोक आख्यान शुक्रवारी (२० डिसेंबर) सायंकाळी सहा ते आठ या वेळेत अनुभवता येणार आहे.सुफी, कव्वाली, चित्रपटगीते, लोकसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत यांचा मिलाफ साधणारी मैफल साधो बँड सायंकाळी आठ ते नऊ या वेळेत सादर करणार आहे.
शनिवारी (२१) ऊर्जा राय यांचा कार्यक्रम सायंकाळी सहा ते पावणेसात या वेळेत होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पावणेसात ते आठ या वेळेत मराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद ‘मी मराठी अभिजात मराठी’ या कार्यक्रमातून साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी (२२ डिसेंबर) जितेंद्र भुरुक आणि त्यांचे सहकारी प्यार का मौसम हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यामुळे महोत्सवाची अत्यंत सुरेल, अविस्मरणीय अशी सांगता होणार आहे. उत्तमोत्तम कलाकार आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आस्वाद पुणे पुस्तक महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात मिळणार असून हे कार्यक्रम चुकवू नये असेच आहेत.


