पुणे,23 डिसेंबर 2024 : ना नफा तत्वावर काम करणाऱ्या टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलचा भाग असलेल्या टोस्टमास्टर्स डिस्ट्रिक्ट125 तर्फे पुण्यात नुकताच आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वसामान्यांमध्ये वत्कृत्व,संवाद,नेतृत्व कौशल्य विकसित करण्याप्रती समर्पित असलेल्या टोस्टमास्टर्स डिस्ट्रिक्ट125 चे सुमारे 75 सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी आदी प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ.जगदीश हिरेमठ, मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.जगदीश हिरेमठ यांनी जीवनशैलीमध्ये बदल आणि प्रतिबंधात्मक आरोग्याच्या माध्यमातून निरोगी राहण्याचा सल्ला दिला.आपल्या शरीराची वयोमानाप्रमाणे होणारा नैसर्गिक बदल याबाबत माहिती दिली.ते म्हणाले की,वैद्यकीय प्रगतीमुळे आयुर्मान वाढत असताना त्या जोडलेल्या वर्षांमध्ये जीवनाची गुणवत्ता राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.हृदय हा आपल्या आरोग्याच्या संपूर्ण कल्याणासाठी आधारस्तंभ आहे.
बॉडी मास इंडेक्स (बीएमआय),रक्तदाब,कोलेस्ट्रॉलची पातळी (मुख्यत्वे एलडीएल कोलस्ट्रॉल) रक्तातील साखरेचे प्रमाण आणि ड जीवनसत्त्व व बी12 ची पातळी हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले.वजन नियंत्रणात ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रतिबंधात्मक आणि सक्रिय आरोग्य व्यवस्थापनासाठी डॉ.जगदीश हिरेमठ यांनी उपस्थितांना एबीसीडीईएफजीएचआय हा कानमंत्र दिला. ए – म्हणजे एन्झायटी मॅनेजमेंट (तणाव व्यवस्थापन),बी-बॉडी मॅनेजमेंट (वजन नियंत्रण),सी – ॲडिक्शन मॅनेजमेंट ,डी – डाएट, ई -एक्सरसाइज, एफ – फ्रेंडस (सामाजिक संवाद),जी -गॉड/गुरू अध्यात्म, एच – होम मेडिकल ॲप्लायन्सेस (रक्तदाब मोजणारे यंत्र,ग्लुकोमीटर,पल्स ऑक्सिमीटर इ.) आणि आय – इन्श्युरन्स (आरोग्य विमा).
स्वत:चा आरोग्य प्रवास स्वत:च्या नियंत्रणात ठेऊन आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो असे डॉ.हिरेमठ यांनी सांगितले.ही प्रतिबंधात्मक धोरणे अवलंबून आपले आयुर्मानच नव्हे तर जीवनाची गुणवत्ता देखील आपण वाढवू शकतो.


