राजगडावर त्रिमितीय माहितीपट बनवणाऱ्या अभ्यासक गणेश धालपे यांचे निरीक्षण
पुणे, दि. 23 : हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या पहिल्या राजगड किल्ल्याचा नकाशा (डिझाईन) वास्तूरचनाशास्त्राच्या दृष्टिने एक महान चमत्कार आहे. अत्युच्च उंचीवरील हा दुर्गम किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्रातील एक अजोड नमुना आहे, असे निरीक्षण गड-किल्ल्याचे अभ्यासक गणेश धालपे यांनी नोंदवले. त्यांनी राजगडावर तयार केलेल्या त्रिमितीय माहितीपटाचे प्रक्षेपण महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) वास्तूरचनाशास्त्राच्या विद्यार्थिनींसमोर केले.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या संस्कृती अध्यायन केंद्रातर्फे ‘गडांचा राजा.. राजांचा गड.. राजगड’ हा त्रिमितीय माहितीपट व त्यानिमित्ताने धालपे यांनी रायगडावरील किल्ल्याच्या बांधकामाची माहिती सांगितली. यावेळी बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, केंद्राच्या प्रमूख डॉ. वैशाली लाटकर, प्रा. निनाद जोग, प्रा. सौरभ मराठे, महर्षी स्त्रीशिक्षण संस्थेच्या उमा जोशी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राजगडावरील अर्ध्या तासांचा माहितीपट धालपे यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेतून तयार केला असून त्यासाठी त्यांना आनंद यात्रा पर्यटन संस्थेच्या उमेश धालपे, विजय सावंत, किरण हिंगे आणि शेखर फदाले यांचे सहाय्य मिळाले. राजगडावरील माहितीपटासाठी कृत्रीम बुध्दिमत्तेसह अन्य काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर धालपे व त्यांच्या सहकार्यांनी केला असून फिरती त्रिमितीय प्रणाली असणारा हा अनोखा प्रकल्प आहे.
बीएनसीएतील संस्कृती अध्यायन केंद्रातर्फे धालपे यांना यापुढे सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. वैशाली लाटकर यांनी दिले. त्या म्हणाल्या की, राजगडसारखा दुर्गम किल्ला या त्रिमितीय चित्रपट पाहताना प्रत्यक्ष फिरून आल्याचा प्रत्यय येतो.
तोरणा किल्ला जिंकल्यावर शिवाजी महाराजांनी पहिली राजधानी असणाऱ्या राजगड या अजोड व अप्रतिम किल्ल्याची अत्यंत अवघड अशी तटबंदी अभ्यास करून बांधून काढली, असे धालपे यांनी सांगितले. ते म्हणाले की, किल्ले बांधणीसाठी लागणारे वास्तूरचनाशास्त्र भिन्न असून शत्रूला सहजासहजी आत शिरता न येण्याची, त्याच्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी लागणारी वैशिष्ट्यपूर्ण रचना अत्यंत कल्पकतेने बांधावी लागते. राजगडासाठी शिवाजी महाराजांनी शत्रूचा हल्ला परतवून लावण्यासाठी तेथील संजीवनी माचीवर खास चिलखती (दुहेरी) तटबंदी बांधली होती.
शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांतील माहिती नुसार पाणी पाहून त्यानुसार मग किल्ला बांधावा असा पहिला नियम घालून दिल्याचे धालपे यांनी सांगितले. त्यानुसार राजगड येथील बुरुज, दरवाजे, तळघरे, बंदूकीने मारा करण्यासाठी आरपार छिद्रे असणाऱ्या जांग्या, बाजारपेठा, मंदिर रचना याचे एक स्वतंत्र शास्त्रच असून वास्तूरचनेच्या अभ्यासासाठी राजगड हा एक अजोड किल्ला आहे. या बांधकामाची वास्तूरचना पाहिल्यावर शिवाजी महाराजांमधील आत्मविश्वासाची प्रचिती येते, असे त्यांनी स्पष्ट
केले.


