पुणे, २० जानेवारी २०२५ : रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 ह्युमन डेव्हलपमेंट अव्हेन्यू 2024-25 च्या वतीने रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित‘दिव्यांग रोजगार मेळाव्याला’ उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता.रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी, व रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती, भाग्यश्री सखी फाऊंडेशन व इतर संस्था या उपक्रमात सह-भागीदार आहेत.
या प्रसंगी रोटरी प्रांत ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ह्युमन डेव्हलपमेंट अव्हेन्यू २०२५ डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉ. दिलीप देशपांडे, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ चे अध्यक्ष डॉ. मंदार अंबिके, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्सच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्सचे क्लब ऍडव्हायजर नितीन शहा, रोटरी डिस्ट्रिक्ट ह्युमन डेव्हलपमेंट सह- संचालक संजीव ओगले व संजय मेहता,रोटेरियन नितीन कुलकर्णी, खजिनदार जितेंद्र महाजन आणि भाग्यश्री सखी फाऊंडेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर शीतल शहा यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना आधारकाठी, क्रचेस, वाॅकर्स आदी उपकरणांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला “विकलांगों की एक तमन्ना है… हमें कुछ बनना है,” हे विकलांग भावना गीत सादर करण्यात आले. या गीताचे लेखन डॉ. दिलीप देशपांडे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ह्युमन डेव्हलपमेंट अव्हेन्यू २०२५ चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर डॉ. दिलीप देशपांडे यांनी केले.
या मेळाव्यात विविध क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच दिव्यांग व्यक्तींचा “रोटरी इन्स्पायरिंग दिव्यांग आयकॉन” म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये गौरी गाडगीळ, अजित कुंटे, अमोल करचे,परशुराम माळी आणि गीतांजली ढोबे यांचा समावेश होता. सत्कारार्थींच्या वतीने अमोल करचे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रोटरी क्लबच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी राबवल्या जाणाऱ्या रोजगार, विविध विकास व स्किल्स डेव्हलपमेंट योजनांची डॉ. दिलीप देशपांडे माहिती यांनी दिली.
रोटेरियन नितीन शहा आणि डॉ. मंदार अंबिके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शाहू मंदिर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. डी.एस. बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 ह्युमन डेव्हलपमेंट सह संचालक संजय मेहता यांनी केले.
या मेळाव्यात उत्पादन, कंपनी प्रशासन,पॅकेजिंग, हाऊस कीपिंग आणि इतर विभागातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी सुमारे ७०० दिव्यांग व्यक्ती आणि सुमारे २५ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.याशिवाय स्पार्कमिंडा फाऊंडेशन तर्फे क्रचेस,वॉकर,आधारकाठी आणि कृत्रिम अवयव यांसारख्या उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले.
मेळाव्यात दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या विविध वस्तूंचे स्टाॅल्स मांडण्यात आले होते.
दिव्यांग मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात कमाईचे शाश्वत स्त्रोत निर्माण व्हावे आणि दैनंदिन जीवन सुलभ व्हावे हा प्रयत्न आहे.


