पुणे, दि.23 : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत (एनएसएस) आयोजित ‘डॉक्टर ॲट डोअर’ या घरपोच वैद्यकीय सेवेवर आधारित नुकतेच एक चर्चासत्र संपन्न झाले. त्यामध्ये 70 विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या प्रोत्साहनातून आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात डॉ. सविता गोखले आणि डॉ. श्रीराम गीत यांनी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. कश्यप यांच्यासह ‘डॉक्टर ॲट डोअर’चे संस्थापक सदस्य अशोक सूरतवाला आणि अनिरूद्ध बंबावाले हे उपस्थित होते. यावेळी बीएनसीएतील एनएसएसच्या प्रमूख डॉ. अमिता प्रधान तसेच डॉ. अवंती बंबावाले यांनीही आपले विचार मांडले.
डॉ. कश्यप म्हणाले की, फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आपल्याकडे कालबाह्य होत असल्यामुळे ही योजना उपयोगी ठरेल.
‘डॉक्टर ॲट डोअर’ या उपक्रमासंबंधी बोलताना अनिरूद्ध बंबावाले म्हणाले की, सात महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या या उपक्रमामध्ये वय वर्षे पाच ते 90 पर्यंत घरातील सदस्याला छोट्या वैद्यकीय मदतीसाठी ही योजना माफक दरात राबवली आहे. त्यानुसार घरापर्यंत पोचून रोगनिदान आणि तपासण्यांचा सल्ला, स्पेशालीस्ट डॉक्टरांशी संपर्क साधण्यास मदत, सर्व प्रकारची ड्रेसिंग, इंजेक्शन देणे इत्यादी सेवांसाठी सध्या सहा डॉक्टरांचा गट तयार करण्यात आला आहे. संपर्कासाठी ‘डॉक्टर ॲट डोअर’ हे मोबाईल ॲपही तयार करण्यात आले आहे.
शहरातील सहकारनगर, वारजे, बावधन, कोथरूड, औंध, हडपसर तसेच डेक्कन जिमखाना भागातील रहिवाशांसाठी हा उपक्रम सुरू झाला आहे. त्यासाठी 8989624040 आणि 8989634040 या भ्रमणध्वनींवर संपर्क साधता येईल.
—


