पुणे,५ फेब्रुवारी 2025 : कर्णदोष असलेल्या मुलांच्या पालकांना माहितीपूर्ण कार्यक्रमांद्वारे अधिक सक्षम बनविण्याच्या हेतूने केईएम हॉस्पिटल पुणे येथील बिग ईअर्स तर्फे एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रभरातील 110 हून अधिक मुलांच्या पालकांनी सहभाग घेतला.यामध्ये शिक्षण,करिअर संधी,कर्णदोष असलेल्या व्यक्तींसाठी नातेसंबंध,लग्न याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ श्रवणशास्त्र तज्ञ डॉ.कल्याणी मांडके आणि वरिष्ठ कान,नाक,घसा शल्यचिकित्सक व बिग इयर्स विभागाच्या प्रमुख डॉ.निलम वेद यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्रांचे आयोजन करण्यात आले.
जुई शेवाळे यांच्या तर्फे आयोजित संवादात्मक प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये दीपक भोसले,देबश्री लोखंडे,संपत हिवरकर,सचिन शिंदे,मल्हार देशपांडे,वैशाली शिंदे,नभा वांबुरकर यांसारख्या यशस्वी व्यक्तींनी आपला अनुभव सांगून उपस्थितांचे मार्गदर्शन केले.
वरिष्ठ कान,नाक,घसा शल्यचिकित्सक व बिग इयर्स विभागाच्या प्रमुख डॉ.निलम वेद म्हणाल्या की,कर्णदोष असलेल्या व्यक्तींना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांबाबत खुली चर्चा करण्यासाठी या कार्यशाळेद्वारे एक योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले.
वरिष्ठ श्रवणशास्त्र तज्ञ डॉ.कल्याणी मांडके म्हणाल्या की,मुलांच्या विकासामध्ये पालकांना काळजी घेणाऱ्या व्यक्तींना ज्ञान आणि साधनांच्या माध्यमातून सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
ही कार्यशाळा म्हणजे कर्णदोष असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना व्यापक साहाय्य प्रदान करण्याच्या बिग ईअर्सच्या प्रयत्नांचा एक भाग होता.


