पुणे: (दि २३ मार्च) देशाच्या स्वातंत्र्यसमरात योगदान दिलेल्या लाखो वीरांचे आपल्याला विस्मरण झाले असून ढाली तलवारीविना स्वातंत्र्य मिळाले असा खोटा प्रचार अनेक वर्षे रुजवल्याने असंख्य स्वातंत्र्यवीरांची अवहेलना झाल्याचे मत पतितपावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष सोपानराव देशमुख यांनी रविवारी संध्याकाळी पार पडलेल्या जाहीर सभेत व्यक्त केले.
कसबा पेठेत झालेल्या जाहीर सभेत थोर शहीद क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना देशमुख यांनी सात लाख बत्तीस हजार तरुण असेच हुतात्मे झाले का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या अप्रकाशित योगदानाचा आपल्या भाषणात उल्लेख केला.
यावेळी हजारो लोकांचा समुदाय ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर उपस्थित होता.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंना फाशी दिलेला दिवस पतितपावन संघटना तसेच अनेक हिंदुत्त्ववादी संघटना क्रांती दिवस म्हणून साजरा करतात.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, “भारत ही क्रांतीची भूमी असून ज्ञानदेवापासून सुरू झालेली क्रांतीची परंपरा समर्थ ते जगदगुरु तुकारामांपर्यंत अखंड तेवत राहिली. छत्रपती शिवराय ते मंगल पांडे आणि झाशीची राणी ते महात्मा फुले आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांच्यापर्यंत हा प्रवास अखंड सुरू राहिला. मात्र मोठे योगदान देऊनही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ आंबेडकर यांची अवहेलना झाली, देशाच्या ध्वज भगवा करण्याचे आणि संस्कृतला राष्ट्रभाषा बनवण्याचे महापुरुषांचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले .”
ब्रिटिशधार्जिण्या आणि अत्याचारी आक्रमकांना आपण इतिहासात नायक बनून ठेवले आहे, असा आरोपही देशमुख यांनी आपल्या भाषणात केला.
प्रदेश सरचिटणीस नितीनजी सोनटक्के यांनी आपल्या भाषणात काँग्रेसने हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करुन बंदी आणल्याचा आरोप केला. राजकीय हिंदुत्त्व टिकवले पाहिजे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह प्रसाद लवळेकर म्हणाले, “भगतसिंग, सुखदेव राजगुरू यांचा इतिहास हा परीक्षेतील दोन मार्कांचा इतिहास राहता कामा नये. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.” हुतात्मा शूरवीरांच्या त्यागाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने सभेचे आयोजन केले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रदेश प्रवक्ते अली दारूवाला यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी सभेला पतितपावन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, पुणे शहर पालक मनोज नायर, उपाध्यक्ष पप्पू टेमघरे, सरचिटणीस मनोज पवार, उपाध्यक्ष अरविंद परदेशी, निलेश जोशी, विजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


