Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorized*गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार* ...

*गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार* *पुणे जिल्ह्यात १५ ते २० वयोगटातील मुलींच्या मोफत एचपीव्ही लसीकरणाला गती*

 

 

पुणे, दि. ११ : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी किशोरवयीन मुलींच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्राधान्य देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला पुणे जिल्ह्यातही गती मिळणार आहे. या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात १५ ते २० वयोगटातील मुलींच्या मोफत एचपीव्ही लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने जीविका फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे.

 

राज्यातील महिलांच्या आरोग्याचे संरक्षण आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रतिबंधात्मक उपाय प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि वर्धा जिल्ह्यांनंतर पुणे जिल्ह्याचाही या उपक्रमात समावेश झाला आहे.

 

*‘मुलींचे संरक्षण करणे हे नैतिक व सामाजिक दायित्व’*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगितले आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, कॉर्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वेळेवर तपासणी आणि एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या माध्यमातून हा आजार रोखण्यावर शासनाचा भर आहे.

 

*पुण्यात सीएसआरच्या माध्यमातून लसीकरण*

पुणे जिल्ह्यातील १५ ते २० वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही लस उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जीविका फाउंडेशन यांच्यात भागीदारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी आणि जीविका फाउंडेशनचे चेअरमन जिग्नेश पटेल यांच्या समन्वयातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय धोरणानुसार १४ वर्षे वयाच्या मुलींच्या लसीकरणावर शासनाचा भर आहे. त्यास पूरक म्हणून पुणे जिल्ह्यात १५ ते २० वयोगटातील मुलींचे लसीकरण सीएसआरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

 

*आकांक्षित तालुक्यांपासून सुरुवात*

या उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांपासून करण्यात येणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणाचा विस्तार करण्यात येईल. पात्र एकही मुलगी लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

जीविका फाउंडेशन हे या राज्यव्यापी अभियानासाठी राज्य अंमलबजावणी भागीदार म्हणून काम करीत असून, जनजागृती, लसीकरणाची अंमलबजावणी आणि समुदाय पातळीवर विश्वास निर्माण करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य केले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments