पुणे,3 एप्रिल 2025 : पुणे स्थित सागरी क्षेत्रातील संघटना असलेल्या कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स (सीएमएमआय), इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिअर्स इंडिया (आयएमईआय) ,इंडियन मरिटाईम फाऊंडेशन (आयएमएफ) आणि महाराष्ट्र मास्टर्स मरिनर्स असोसिएशन यांच्या तर्फे ६२व्या राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त (नॅशनल मरिटाईम डे) शनिवार,5 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पीवायसी पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पश्चिम नौदलाचे माजी प्रमुख वाईस ॲडमिरल (निवृत्त) विनोद पसरिचा उपस्थित राहणार आहेत.कॅप्टन आर.हजरनवीस, कॅप्टन उन्मेष अभ्यंकर,कॅप्टन विजय बर्वे,प्रमुख अभियंता आर.डी.भावे या सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या वरिष्ठ व्यावसायिकांचा त्यांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, ही माहिती पत्रकार परिषदेत इंडियन मरिटाईम फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित,इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिअर्स इंडिया,पुणेचे अध्यक्ष व माजी मुख्य अभियंते संजीव ओगले, कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स (सीएमएमआय) चे अध्यक्ष कॅप्टन मिलिंद फडणीस आणि सीएमएमआयचे सचिव कॅप्टन किरण जोशी यांनी दिली.
इंडियन मरिटाईम फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित म्हणाले की,यंदाच्या आयएमओची संकल्पना ही अवर ओशन,अवर ऑब्लीगेशन,अवर अपॉर्च्युनिटी (आपले सागर,आपली जबाबदारी,आपली संधी) या विषयावर केंद्रित आहे. हीच संकल्पना घेऊन पुण्यातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ही संकल्पना जागतिक अर्थव्यवस्थेत महासागराची महत्त्वाची भूमिका प्रतिबिंबित करते.जगभरातील 80 टक्के हून अधिक व्यापार हा सागरी मार्गाने होतो आणि त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो.त्याशिवाय समुद्र हे अन्नाचे स्त्रोत, असंख्य सागरी प्रजातींचे घर आणि जागतिक हवामानाचे नियामक आहे. 7500 हून अधिक लांबीचा सागरी किनारा आणि 12 प्रमुख बंदरे असलेला भारत हा जागतिक शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.
इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिअर्स इंडिया,पुणेचे अध्यक्ष व माजी मुख्य अभियंते संजीव ओगले म्हणाले की, पुण्याचा सागरी क्षेत्राशी आधीपासूनच दृढ संबंध आहे.तीन संघटना आणि चार प्रशिक्षण संस्थांसह पुण्यात 5000 हून अधिक सागरी क्षेत्रातील आजी-माजी व्यावसायिक आहेत.त्यातील सुमारे 1000 व्यावसायिक सध्या कार्गो व प्रवासी जहाजांवर कार्यरत आहेत.
सीएमएमआयचे संस्थापक सदस्य व इंडियन कोस्टल कॉन्फरन्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सुधीर सुभेदार म्हणाले की, बंदरांमधील पायाभूत सुविधा,शिपबिल्डींग व कोस्टल क्षेत्रातील गुंतवणूक याशिवाय सागरी क्षेत्राच्या शाश्वत भविष्यासाठी,सागरी संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी आणि हवामान बदल संकटाचा सामना करण्यासाठी या क्षेत्रात शाश्वतता उपक्रम महत्त्वाचे ठरतील.
राष्ट्रीय सागरी दिनाचे महत्त्व
5 एप्रिल 1919 रोजी एसएस लॉयल्टी ही सिंधिया स्टील नॅव्हीगेशन लि.च्या मालकीची आणि वालचंद हिराचंद व नरोत्तम मोरारजी यांचे समर्थन असलेल्या जहाजाचा मुंबईवरून युनायटेड किंग्डम साठी प्रवास सुरू झाला.त्यावेळेसच्या ब्रिटिश राजवटीच्या प्रतिकूल धोरणांना तोंड देत हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. सर्व अडचणी असूनही सिंधिया स्टीम नॅव्हीगेशन लि.ही पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शिपिंग कंपनी बनली व भारतातील शिपिंग उद्योगाला चालना मिळाली.शिपिंग उद्योगाला आता आणखी चालनेची गरज असून शिपबिल्ंडींगमध्ये अधिक गुंतवणूक,कमी लॉजिस्टिक्स खर्च,कार्यक्षम उर्जा वापर आणि शाश्वत शिपिंग धोरणांची आवश्यकता आहे.


