पुणे: मोहन शेटे लिखित व भारतीय विचार साधना निर्मित ‘ रणधुरंदर नानासाहेब पेशवे ‘ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले.
सन १८५७ च्या स्वातंत्र्य समरचे शिल्पकार नानासाहेब पेशवे यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त उत्तर प्रदेशातील कानपूर जवळ बिठूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, अजित तुकदेव, निलिमा चिवटे, कुंदनकुमार साठे, सुधीर थोरात, संदीप महिंद उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांविरुद्ध संपूर्ण देशाला संघटित करण्याचे अतुलनीय कार्य नानासाहेबांनी केले होते. या बिठूरच्या पावन भूमीवर नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्ध प्रशिक्षण घेतले होते.ज्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यांचे कृतज्ञतेने स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे.
मोहन शेटे म्हणाले, भारतातील अनेक महापुरुषांनी आपल्या समाजाला प्रेरणा देत महान कार्य घडवून आणली. मात्र नानासाहेब पेशवे यांनी मराठी, हिंदी, कानडी, तेलगू, मल्याळम, तामीळ, बंगाली, सिंधी, गुजराती अशा सर्व लोकांना प्रेरणा देत अखिल भारतीय स्वातंत्र्य समर घडवून आणले म्हणून ते आधुनिक काळातील सर्व भारतीयांचे नेते
होते.


