Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedसख्यांनो,आत्मविश्वासाने जगा                    ...

सख्यांनो,आत्मविश्वासाने जगा                                    _अलका भुजबळ 

 

 

मनामध्ये आत्मविश्वास असेल तर तुमच्या जीवनात तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल, असा मूलमंत्र बहु आयामी अलका भुजबळ यांनी तमाम सख्यांना दिला. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील “हॅलो सखी ” या कार्यक्रमात

डॉ. मृण्मयी भजक यांनी त्यांची नुकतीच ‘बहुआयामी सखी ‘ म्हणून मुलाखत घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

एका प्रश्नाचे उत्तर देताना अलका भुजबळ म्हणाल्या, एखादी घटना मनाविरुद्ध घडत असेल तर महिला, मुलींनी त्यावर विचार करून आपले विचार ठामपणे मांडले पाहिजे. आपल्या विचारानुसार ठाम भूमिका घेतली पाहिजे, तरच त्या त्यांच्या जीवनात यशस्वी होतील.

 

मी मुंबईत राहणारी असूनही माझ्या घरची मंडळी जुन्या विचारसरणीची असल्यामुळे मी दहावी पास झाल्या झाल्या माझे लग्न उरकण्याची त्यांना घाई झाली होती. परंतु मला आधी शिक्षण घ्यायचे होते, माझ्या पायावर उभे राहायचे होते आणि मनासारखा जोडीदार मिळाला तरच लग्न करायचे असा मी ठाम निर्णय घेतला होता.असे सांगून त्यांनी असाच ठामपणा प्रत्येक महिला आणि मुलीजवळ असला पाहिजे,असे प्रतिपादन केले.

 

इतर सख्यांना तुम्ही कसे पुढे आणले, रिटायरमेंट नंतर वेळ कसा घालवता ? या प्रश्नावर बोलताना अलका भुजबळ म्हणाल्या, प्रत्येकीकडे काही ना काही कला असते. त्यांच्या कलेला वाव मिळावा, संधी मिळावी म्हणून आम्ही आनंद मेळावा भरवित होतो.त्यात प्रत्येकजण आपली कला दाखवीत असते.

आरोग्य शिबीर भरवित होतो. समाज माध्यमांद्वारे आता तर अनेक दालने खुली झाली आहेत. महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा कसा फायदा घ्यायचा हे आपण ठरवले पाहिजे. उद्योग,व्यवसाय करताना आत्म विश्वास महत्वाचा असून तो आपण विकसित केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

 

मुळातच माझ्यात खिलाडू वृत्ती होती. त्यामुळे शाळेत खेळायला आवडतं असे. एमटीएनएलमध्ये व्हॉलीबॉल खेळत असे. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे, पण हे सर्व नोकरी सांभाळून करीत असे. यासाठी सासूबाई,

पती ,मुलगी यांचं नेहमीच प्रोत्साहन मिळत होते, असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

 

तुमचा अभिनयाचा प्रवास कसा होता? या प्रश्नावर बोलताना अलका भुजबळ म्हणाल्या, कला क्षेत्रातील अनुभव चांगला होता. सुहासिनी, सुहास जोशी यांच्या सारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळाले. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या दामिनी, बंदिनी, आई, बंदिनी, हे बंध रेशमाचे, महाश्वेता, जिज्ञासा आदी मालिकांमधून काम केल्याचे सांगून त्यांनी यासाठी देखील घरातून पूर्ण पाठिंबा होता, असे त्यांनी सांगितले.

कॅन्सर सारख्या आजारावर कशी मात केली ? यावर बोलताना त्या म्हणाल्या, पोटात एक गाठ होती. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ती काढली.ती गाठ कॅन्सरची होती.कॅन्सर झाला म्हटल्यावर ते मान्य करायलाच पाहिजे आणि ते मी मान्य केले. पुढे केमोसारखे उपचार घेतले. याच दरम्यान कॅन्सरबाबत लोकांमधे जाणीव जागृती व्हावी म्हणून एका लेखनिकाच्या साहाय्याने

‘ कॉमा ‘ नावाचे पुस्तक लिहिले. कॅन्सर म्हणजे फुल स्टॉप नाही, कॉमा करा आणि पुढे जायाचे असे सांगून त्या म्हणाल्या, कोणताही आजार झाला तरी आपला दृष्टीकोन

सकारात्मक हवा. या आजारामध्ये पती देवेंद्र भुजबळ, मुलगी देवश्री यांनी खूप मनोबल वाढविले,असे त्यांनी सांगितले. या आजारातून बाहेर पडल्यानंतर ‘आरोग्य संवादिनी ‘ हा कार्यक्रम सुरू केला. माझ्यावर

दहा मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार केली. मी कसे होते, यातून बाहेर कसे पडले आदी बाबींचा त्यात उल्लेख आहे. महिलांनी वेळच्या वेळी आपली तपासणी करून घेतली पाहिजे, आपले आरोग्य आपल्या हाती आहे, वेळेवर जेवण घ्यावे,नियमित व्यायाम, योगासने,ध्यान धारणा करावी सल्ला आपण या कार्यक्रमातून देत असतो, असेही त्या म्हणाल्या.

 

सध्या अलकाचे काय चालले आहे ? हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात त्या म्हणाल्या, सध्या ‘न्यूज स्टोरी टुडे ‘ हे पोर्टल आम्ही चालवतो. सुमारे ८५ देशात हे पोर्टल पोहचले असून पाच सहा लाखपेक्षा अधिक त्याचे व्ह्यूज आहेत असे सांगून राजकारण आणि गुन्हेगारी यासारखे विषय वगळून साहित्य, आरोग्य, समाज सेवा, यश कथा,पुस्तक परीक्षण, पर्यटन, सकस मनोरंजन , कविता व अन्य विषय आम्ही हाताळतो. शिवाय दररोज एक नियमित सदर असते. पोर्टल साठी देश विदेशातून लेख , कविता येत असतात, असे त्यांनी नमूद केले. शिवाय पुस्तक प्रकाशन व्यवसाय आम्ही सुरू केला असून बरीच पुस्तके प्रकाशित झाली तर काही प्रकाशनाच्या वाटेवर असल्याचे अलका भुजबळ यांनी सांगितले.

 

संध्या पुजारी निर्मात्या असलेल्या या कार्यक्रमाला ठीक ठिकाणाहून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments