पुणे,15 एप्रिल 2025 : कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) चा भाग असलेल्या व तरूणांसाठी व्यासपीठ असलेल्या यंग इंडियन्स (वायआय) पुणे यांच्या 2025 च्या नवीन नेतृत्वाची व कार्यकारी मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. यंग इंडियन्स (वायआय) हा कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचा (सीआयआय) अविभाज्य भाग असून भारतीय तरूणांना एकत्रित करण्यासाठी,नेतृत्व करण्यासाठी,सह-निर्मितीसाठी आणि विकासात योगदान देणारे तरूण घडविण्यासाठी एक संस्था म्हणून कार्यरत आहे. 2025 साठी यंग इंडियन्स (वायआय) पुणे चॅप्टरचे अध्यक्ष म्हणून समीर धामणगांवकर आणि सह-अध्यक्ष म्हणून योगेश देसाई यांनी निवड करण्यात आली आहे. यांच्या नेतृत्वाखाली ही टीम उद्योजकता,नवोन्मेष,शाश्वतता,रस्ता सुरक्षा आणि युवा सक्षमीकरणात प्रभावी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करेल.
वर्षभरातील उपक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण,उद्यमशीलता,नवोपक्रम,हवामान बदल,आरोग्य,रस्ता सुरक्षा,सुलभता आणि ग्रामीण उपक्रम, युवा सक्षमीकरण, शालेय विद्यार्थ्यांचे सशक्तीकरण यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यातील सदस्यांची घोषणा देखील करण्यात आली.
याप्रसंगी यंग इंडियन्स (वायआय) चे अध्यक्ष समीर धामणगांवकर म्हणाले की, जास्तीत जास्त युवा नेतृत्वांपर्यंत पोहचून,त्यांच्याशी संवाद साधून,भागीदारी अधिक दृढ करत काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
सहअध्यक्ष योगेश देसाई म्हणाले की,सहयोगात्मक उपक्रमांच्या माध्यमातून अभिनवता,उद्योजकतेला चालना देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.


