पुणे — पावसाळ्यापूर्वी नालेसफाई सोबतच पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करावी. अशी मागणी पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे
मागील दोन तीन वर्षात पुणे शहरात पावसाने आपले रौद्र रूप दाखविले आहे. अवेळी आणि कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते व तेथील नागरिकांना प्रचंड त्रासास तोंड द्यावे लागते. 2023 साली तर स्वतः मनपा आयुक्त विक्रमकुमार यांना रस्त्यावर उतरून विविध सोसायटीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याच्या कामावर देखरेख करावी लागली होती.
सध्या मनपाची नालेसफाई ची कामं सुरु आहेत, तसेच पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन यांची देखील सफाई सुरु आहेच मात्र गत दोन वर्षे शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते अश्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.
उदाहरणार्थ प्रभाग 13 मधील मोरयाकृपा, मधुसंचय,गंगानगरी, चिंतामणी, कुमार परितोष,स्नेह म्हाडा, समर्थ पथ इत्यादी ठिकाणी प्रचंड पाणी साचले व नागरिकांचे जीवनच धोक्यात आल्याचे चित्र होते.यापुढील काळात अनियंत्रित पाऊसाचीच शक्यता गृहीत धरून योजना आखावी अशी आग्रही मागणी करत आहे.
सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे अश्या ठिकाणांची यादी उपलब्ध आहे. ह्या वर्षभरात त्या त्या ठिकाणी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याचा तपशील जाहीर करावा व ह्या वर्षी तेथील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची हमी द्यावी. अद्याप काही ठिकाणी जर उपाययोजना झाली नसेल तर ती पावसाळ्यापूर्वी हातात असलेल्या दीड महिन्यात पूर्ण करावी अशी आग्रही मागणी करत आहे.


