Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedअक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर संगमनेरमध्ये मालपाणी उद्योग समूहाचा भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा! १५...

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर संगमनेरमध्ये मालपाणी उद्योग समूहाचा भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा! १५ एप्रिल ही नावनोंदणीची अंतिम तारीख होती. ३० एप्रिलला, हजारोंच्या उपस्थितीत अनेक जोडपी विवाहबद्ध होतील. फक्त १ रुपयात विवाह लावण्याची ही २८ वर्षांची गौरवशाली समाजसेवी परंपरा यंदाही अभिमानाने पुढे नेली जाईल!

संगमनेरमध्ये, ३० एप्रिल रोजी बुधवारी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी चार वाजता मालपाणी लॉन्स येथे मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने सर्वधर्मीय भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सोहळ्यात, अनेक जोडपी विवाहबद्ध होऊन हजारोंच्या उपस्थितीत आपल्या वैवाहिक जीवनाचा शुभारंभ करतील.)

या सोहळ्यात विवाहबद्ध होण्यासाठी सुरु झालेल्या नावनोंदणीला सुरु झाली असून त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालपाणी परिवाराच्या वतीने सुरु करण्यात आलेला हा लोकहिताचा उपक्रम जनतेच्या उस्त्फुर्त प्रतिसादाने रौप्यमहोत्सवी ठरला आहे. सर्वधर्मीय समाजाला वरदान ठरलेल्या या सोहळ्याला २८ वर्षांची परंपरा आहे. आजवर १६०० हून अधिक परिवार या सोहळ्यामुळे परस्परांशी नात्यात जोडले गेले आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून समूह वर्षनुवर्षे हा उपक्रम राबवीत आहे. केवळ एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात होणारे विवाह राज्यात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले आहेत. या सोहळ्यात हिंदू , मुस्लीम ,ख्रिश्चन आणि बौद्ध अशा सर्वधर्मीय वधू वरांचे विवाह त्या त्या धार्मिक प्रथेनुसार लावण्यात येतात. अशा प्रकारे ही सर्व जोडपी आपल्या सहजीवनाची सुरुवात विशाल जनसमुदायाच्या साक्षीने करणार आहेत.

मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथजी व स्वर्गीय माधवलालजी मालपाणी यांना २८ वर्षांपूर्वी १९९७ साली ही संकल्पना सुचली. विवाह समारंभांवर होणारी उधळपट्टी त्यामुळे मुलीच्या परिवारांवर होणारा कर्जाचा बोजा या सर्व बाबी लक्षात घेऊन या सोहळ्याची आखणी करण्यात आली. पहिल्या वर्षापासून आजवर प्रत्येक वर्षी या सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. एकंदरीत समाजाने ही संकल्पना चांगलीच उचलून धरली आहे असे आजवरच्या अनुभवावरून दिसून आले आहे. या सोहळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

संगमनेरचे वैशिष्ट्य म्हणून हा ‘मालपाणी पॅटर्न‘ अनेक परिवारांना हवाहवासा वाटू लागला आहे. त्यापाठीमागे या सोहळ्याच्या आयोजनातील नीटनेटकेपणा हे आहे. या सोहळ्यासाठी कोणत्याही जाती धर्माचे बंधन नाही. कायद्याने सज्ञान असलेले वधू वर आपली नावे यामध्ये नोंदवू शकतात. हिंदू, मुस्लीम, बौद्ध,ख्रिश्चन अशा सर्वधर्मीय वधू वरांचे विवाह त्या त्या धार्मिक प्रथेनुसार लावण्यात येतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गरजवंत, मध्यमवर्गीय यांसह आजवर अनेक सुस्थापित उच्चशिक्षित वधू वरही या सोहळ्यात विवाहबद्ध झाले आहेत.

सजविलेला सुसज्ज मंडप, वधूवर निवास व्यवस्था, भोजन सुविधा, सवाद्य मिरवणूक, हार-तुरे, सस्नेह भेट दिले जाणारे संसारोपयोगी साहित्य , वधू वरांचे खास विवाहासाठी बनविण्यात आलेले पोषाख, मुंडावळ्या, अक्षता, पुरोहित वृन्दाकडून मंत्रोच्चार तसेच मंगलाष्टके आणि विवाहानंतर अग्नीच्या साक्षीने होणारी सप्तपदी यानुसार हिंदू विवाह संपन्न होतात. तर बौध्द, मुस्लीम, ख्रिश्चन यांचे विवाह त्यांच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत धार्मिक रीतीरीवाजानुसार पार पडतात. वधू वरांकडील प्रत्येकी शंभर वऱ्हाडीच्या भोजनाची व्यवस्था केली जाते.

प्रत्येक दाम्पत्यास मालपाणी समूहाच्या वतीने आहेर म्हणून स्टील कपाट, भांडी, रॅक, असे सुमारे पंचवीस हजारांचे संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात येते. वधू वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील सुमारे पंधरा ते वीस हजारांचा जनसमुदाय या कार्यक्रमाचा साक्षीदार असतो. माननीय मंत्रीगण, खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते अशी समाजाच्या सर्व थरातील माणसे उपस्थित असतात. संसाराची सुरुवात करतानाच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी जोडप्याने घ्यावी यासाठी प्रत्येक जोडप्यास एक रोप जोपासण्यासाठी भेट दिले जाते. व-हाडी मंडळींच्या मनोरंजनासाठी वाद्यवृंदाची खास व्यवस्था केली जाते. सेल्फी काढण्यासाठी सुंदर सजावट असलेली विशेष व्यवस्था केली जाते. पालकांच्या सूचनांचे स्वागत केले जाते.

स्वागत कक्ष, चौकशी, निवास व्यवस्था, स्टेजव्यवस्था, सजावट, भोजन, वाढप, वीज व्यवस्था, पाणी व्यवस्था, स्वच्छता, भेटवस्तू, अन्य धर्मीय विवाह, मिरवणूक, सुरक्षा, फोटो प्रसिद्धी, बैठक, सत्कार समिती, अशा सुमारे पंचवीस समित्या कार्यरत असतात. उद्योग समुहातील कर्मचारी आणि कामगार प्रतिनिधी मिळून या नियोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात.

सकाळी १० वाजता वऱ्हाडी मंडळींच्या आगमनाने सुरु होणारा हा अनोखा सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता नववधूंना सासरी जाण्यास निरोप देऊन संपन्न होतो. उद्योग समूहाचे संचालक सर्वश्री राजेश , डॉ संजय, मनीष, गिरीश, आशिष , जय , यश, हर्षवर्धन मालपाणी आदी सर्व संचालक आणि मालपाणी परिवारातील सर्व महिला सदस्य देखील हा सोहळा यशस्वी करण्यास जातीने लक्ष घालतात. सामाजिक ऋण फेडण्यासाठी हा उपक्रम गेली २८ वर्षे अव्याहत सुरु असलेला हा उपक्रम राज्यात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments