हरितवीर मारुती कदम
नवी मुंबईतील सानपाडा येथील सीताराम मास्तर उद्यानात कालची सकाळ रोजच्या पेक्षा वेगळीच होती. त्याला कारणही तसेच होते. ते म्हणजे सकाळी ६.३०,७.०५ आणि ७.५० अशा तीनही ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन मारुती कदम यांचा ७६ वा वाढदिवस जोशात साजरा करण्याचे ठरविले होते.
एरव्ही या तीनही ग्रुपचे मिळून १५० सदस्य आपापल्या वेळेप्रमाणे येतात,आपापल्या ऍक्टिव्हिटीज करतात आणि पुढील दैनंदिन कामाला लागतात.पण कालचा दिवस रोजच्या रूटीन ला अपवाद ठरला.सर्व जण ८ वाजता जमल्यावर अनेक जणांनी कदम यांच्या गौरवपर दिलखुलास भाषणे केली.
कदम यांनी ही या सर्व सत्काराला समयोचित उत्तर दिले आणि मस्त पैकी मिसळपाव खाऊन,चहा पाणी घेऊन कदम यांचा वाढदिवस साजरा झाला.
आता इतके वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडणे साहजिकच आहेत की कोण हे मारुती कदम ? ज्यांना इतक्या लोकांचे प्रेम लाभले ? तर मारुती कदम म्हणजे नवी मुंबईतील आमच्या सानपाडा परिसरात सतत झाडे लावण्यात आणि ती जगवण्यात कार्यमग्न असलेले
व्यक्तिमत्व होय.
हरियाली लोक कल्याण सेवा समितीचे , मानव कल्याण सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष
असलेले मारुती कदम हे त्यांच्या कामामुळे आज “हरितवीर” म्हणून ओळखले ते ओळखले जातात. या त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.तर जाणून घेऊ या त्यांचा जीवन प्रवास….
कोल्हापूर जिल्ह्यातील डोनोली गावात मारुती कदम यांचा जन्म झाला. घरी अत्यंत गरिबी असल्यामुळे त्यांना बालपणी रस्त्यावर खडी टाकण्याचे काम करावे लागले. पुढे बांबवडे गावी त्यांनी
मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतले.
कामे करीत करीत शिक्षण घेत असतानाच त्यांनी कोल्हापूर येथील बालकृष्ण गोखले महाविद्यालयातून भूगोल विषयात एम ए केले.
कदम यांना त्यांच्या उच्च शिक्षणाचे फळ मिळाले, ते भारत सरकारच्या एक्साईज खात्यात नोकरी लागून. या नोकरीच्या निमित्ताने ते वयाच्या चोवीसाव्या वर्षी आधी मुंबईकर आणि नंतर नवी मुंबईकर झाले.१९९७ मध्ये ते सानपाडा येथे रहायला आले.तेव्हा या नव्याने उभ्या रहात असलेल्या परिसरात झाडांचे प्रमाण नगण्य आहे हे पाहून ते खंतावले.मुळात स्वतः ग्रामीण भागातून आलेले असल्यामुळे, त्यात त्यांना निसर्गाची फार आवड असल्याने उघडे बोडके सानपाडा पाहून ते अस्वस्थ झाले. त्यामुळे त्यांनी स्वतःच काही करण्याचे ठरविले आणि कामाला सुरुवात केली.
सुरुवातीला काही मोजक्या लोकांच्या सहकार्याने कदम यांनी रिकाम्या जागेचा फायदा घेऊन साप, काटे, खाजखुजली, मोकाट जनावरे, खड्डे, दरवर्षी वाढणारे गवत , होणारी पानझड या नैसर्गिक अडथळ्यांबरोबर
प्लास्टीकचा त्रास, गुटका बॅग्ज, बिस्कीटचे, फास्ट फुडचे पेपर, शौच-लघवी करणाऱ्या लोकांचा त्रास, रेल्वे लाईन ओलांडून, पाने, फुले,झाडे तोडणाऱ्या लोकांचा त्रास हे सर्व सहन करून व लोकांमध्ये जागृती निर्माण करून या विभागाचा विकास सुरू केला.
त्यासाठी सानपाडा रेल्वे स्थानक आणि या स्थानकापासून वाशी रेल्वे स्थानकाच्या मध्यापर्यंत व संपूर्ण सेक्टर २ व्यापून वृक्षारोपण व संवर्धनाचे काम हाती घेतले. सानपाडा रेल्वे स्थानकाजवळ त्यांना अनेक बरेवाईट अनुभव आले. परंतु कामात अखंडता , चिकाटी, नियमितपणा ठेवल्याने आजचे हरित स्वरूप या परिसराला प्राप्त झाले आहे.
सुरुवातीला कदम यांनी रोपांना बाटलीने पाणी घातले. नंतर सानपाडा रेल्वे स्थानकाजवळ विहीर काढून या झाडाना पाणी देण्यात येत होते. पुढे मात्र नवी मुंबई महापालिकेच्या वतीने या झाडांना मोफत पाणी देण्यात येऊ लागले.हळूहळू झाडांची वाढ होत गेली आणि आज सानपाडा येथे एक हिरवा पट्टाच नव्हे तर प्राणवायू तयार करणारा कारखानाच उभा राहिला आहे, असे म्हणा ना!
कदम यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पुढे लोक सहभागातून “हरियाली लोक कल्याण सेवा समिती” या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली. आज या संस्थेचे ४५० आजीव सभासद आहेत.इतकेच नव्हे तर संस्थेचे सदस्य चिकाटीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम सातत्याने करीत असतात. ८० टक्के काम श्रमदानातून तर २० टक्के काम हे लोकांच्या आर्थिक मदतीतून करण्यात येत असते. या कामामुळे सेक्टर-२, ८,१४ येथील प्रदुषण पातळी शून्यापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे स्थानिक घरांचे दर नेहमीच्या किंमतीपेक्षा ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहे.
लोकांच्या हितासाठी नवीन
३० प्रकाराच्या औषधी झाडांची लागवड करून त्यांची जोपासना सुरू केल्याने आता त्याचा फायदा जनतेला होत आहे.
कदम यांनी गेल्या २० वर्षापासून सुमारे ६ हजार वृक्षांचे रोपण व संवर्धन
केले आहे . स्वच्छतेकडेही ते तितकेच लक्ष देत असतात.
कदम यांनी ते राहत असलेल्या
सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये मिनी नर्सरीची स्वतः निर्मिती
केली आहे. तिथे ते रोपे तयार करून ठेवतात. पावसाळ्यामध्ये भिंतीच्या कडेला, गल्लीमध्ये ,अशी जिथून मिळतील तिथून रोपे आणायची ,ती थैलीत जमवून त्याचे ते संवर्धन करतात.अशा प्रकारे अनेक रोपे सेक्टर ८ मधील नवरत्न सोसायटी, सेक्टर १५ मधील भुमिराज अबोड सोसायटीला तसेच इतर अनेक लोकांनाही मोफत रोपे देण्यात आली आहेत. अशा मोफत दिलेल्या रोपांची संख्या जवळपास १० हजार पर्यंत जाईल. हे सर्व करण्यामागचे कारण म्हणजे वृक्षारोपण व संवर्धन या माध्यमातून पर्यावरण संवर्धन होऊन जमिनीच्या पाण्याची पातळीमध्ये सुधारणा होते यावर कदम यांचा ठाम विश्वास आहे.
या सर्व बाबतीत जनजागरण व्हावे म्हणून कदम शाळा, कॉलेज येथे पर्यावरण,संस्कार, आयुर्वेद दर्शन, योगदर्शन या विषयांवर व्याख्याने देत असतात. विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील मुंबई व नवी मुंबई येथील महाविद्यालयांचा सहभाग घेण्यात येतो.तसेच रॅली काढणे, निसर्गमित्र स्मरणिका प्रकाशित करणे,असे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
कदम २००९ साली सरकारी नोकरीतून निवृत्त झाले . तेव्हापासून ते सकाळचा व्यायाम, चालणे, योगासने करणे आदी बाबी आटोपल्या की स्वतःला वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी वाहून घेतात. कधी कोणी सोबत नसले तरी “एकला चलो रे” या भावनेतून ते कार्यरत असतात. ते जर काम करताना दिसले नाही तर समजायचे की ते नवी मुंबई बाहेर आहेत म्हणून.
आता कदम यांनी
नवी मुंबईतील नागरिकांना मार्गदर्शन करण्याचा व रोपे स्वतः तयार करून देण्याचा उपक्रम चालू केला आहे.
वृक्षारोपण व स्वच्छत्तेतून पर्यावरण संतुलन यावर त्यांचा फारच भर असतो.
प्रत्येक व्यक्तीने स्वावलंबी जीवन जगले पाहिजे असे म्हणणारे कदम स्वतः पहाटे तीन वाजता उठतात. दोन तास ध्यान धारणा,योगासने करतात. या नंतर ते स्वतः चे
दिवसभरातील जेवण स्वतः बनवून घेतात. वेळ प्रसंगी घरच्यांसाठी ही जेवण बनवितात.
कदम स्वतःच्या आरोग्याबाबत तर दक्ष आहेतच पण ते वेळोवेळी , संधी मिळेल तेव्हा सर्वांना आरोग्याचे,नियमित व्यायाम करण्याचे,सतत सक्रिय राहण्याचे महत्व पटवून देत असतात.
कोणे एकेकाळी रस्त्यावर खडी फोडलेल्या कदम यांच्या तिन्ही मुलांनी त्यांच्या कष्टाचे चीज केले आहे. त्यांची एक मुलगी व जावई ,नातवंडे अमेरिकेत तर दुसरी मुलगी, जावई,नातवंडे इंग्लंडमध्ये स्थायिक आहेत. मुलगा आणि सून ही उच्च शिक्षित असून वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.
दिवसेंदिवस उजाड होत चाललेले जग बघितले की असे वाटते,असे हरितवीर जागोजागी निर्माण होण्याची आज नितांत गरज आहे.
लेखन: देवेंद्र भुजबळ
9869484800.


