Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुत्राशय कर्करोग जागरूकता महिना - मे 2025 निओब्लॅडर तंत्रामुळे मुत्राशय कर्करोगाच्या...

मुत्राशय कर्करोग जागरूकता महिना – मे 2025 निओब्लॅडर तंत्रामुळे मुत्राशय कर्करोगाच्या रुग्णांना चांगले जीवनमान”

पुणे,9 मे 2025 : कर्करोगामुळे मुत्राशय काढून टाकलेल्या रूग्णांना तुलनेने नवीन तंत्र असलेल्या “ फ्रॉग निओब्लॅडर फॉर्मेशनमुळे” चांगले जीवनमान प्राप्त होत आहे.

जेव्हा मुत्राशयाचा कर्करोग किंवा कोणत्याही इतर आजारामुळे रूग्णामध्ये रॅडिकल सिस्टेक्टोमी या प्रक्रियेद्वारे संपूर्ण मूत्राशय काढण्यात येते तेव्हा,शरीराला मुत्र साठविण्यासाठी आणि शरीरातून बाहेर काढण्यासाठी शल्यचिकित्सकांना पर्यायी मार्ग तयार करावा लागतो.त्यातील एक पर्याय म्हणजे निओब्लॅडर तयार करणे.

निओब्लॅडर फॉर्मेशन ही प्रक्रिया लहान आतड्याच्या एका भागातून नवीन मुत्राशय तयार करण्याची प्रक्रिया आहे.ज्यांना मुत्राशयाच्या कर्करोगामुळे किंवा इतर परिस्थितीमुळे मुत्राशय काढून टाकावे लागते,त्यांच्यावर ही प्रक्रिया केली जाते.

“निओ” हा लॅटीन शब्द असून याचा अर्थ “नवीन” आहे. निओब्लॅडर हा मुळ मुत्राशयासारखे कार्य करते. हा पर्याय अनेक रूग्णांना शस्त्रक्रियेनंतर चांगले जीवनमान राखण्यास मदत करू शकते.

विश्वराज हॉस्पिटल,लोणी येथील वरिष्ठ मुत्ररोग तज्ञ डॉ.संजय धनगर यांच्या मते, निओब्लॅडर हे लहान आतड्याच्या शेवटच्या भागापासून (इलियम) तयार केले जाते. निओब्लॅडर बनविण्याकरिता साधारण 60 सेमी इलियम वापरण्यात येते. यात मोठे आतडे आणि छोटे आतडे जिथे मिळते (आयसी जंक्शन) अशा भागाला वगळण्यात येते. इतर इलियम भाग हा एकमेकांशी जोडला जातो. हा 60 सेमी चा इलियम भाग ओटीपोटाच्या मागील भिंतीशी जोडला जातो,ज्यामुळे राहिलेल्या आतडीचा रक्तस्त्राव कायम राहतो. या प्रक्रियेला 6 ते 8 तास लागू शकतात.

ते पुढे म्हणाले की, मुत्राशय काढल्यानंतर स्टोमा हा देखील पर्याय असतो व यामध्ये मुत्र साचविण्यासाठी आणि बाहेर टाकण्यासाठी एक बाह्य पिशवी दिली जाते. मात्र निओब्लॅडर मुळे याची गरज भासत नाही. योग्य प्रशिक्षण आणि कार्यक्षमतेसह रूग्णांमध्ये सामन्यपणे लघवी करण्याचे कार्य कायम राहू शकते. मात्र यावर पुर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी सुमारे 6 ते 12 महिने लागू शकतात. कालांतराने निओब्लॅडरचे नियंत्रण हळूहळू वाढते. सामान्यत: रात्रीपेक्षा दिवसभरातील नियंत्रण अधिक वेगाने वाढते. रूग्णाला हे सर्व कार्य नियमित व कायम ठेवण्यासाठी आयुष्यभर पाठपुरावा करावा लागतो.

ते पुढे म्हणाले की, ज्यांचे वय जास्त आहे, ज्यांना जास्त प्रमाणात सहव्याधी आहेत, मध्यवर्ती मज्जासंस्थांचे आजार आहेत, ज्यांच्या आतड्याची शस्त्रक्रिया झाली आहे, किंवा आतडे काढून टाकले आहे, किंवा ज्यांचे एकंदर आरोग्य नाजूक आहे,असे रूग्ण या शस्त्रक्रियेसाठी पात्र नाहीत.

निओब्लॅडर प्रक्रियेत अधिक सुधारणा करणारे “फ्रॉग निओब्लॅडर तंत्र” हे प्रख्यात युरोसर्जन डॉ.आर.के.शिंपी यांनी विकसित केलेले आहे. फ्रॉग निओब्लॅडर हे तुलनेने नवीन तंत्र असून अनेक युरोलॉजिस्ट याचा वापर करत आहेत. याचे वैशिष्टय डिझाईन/आकारामध्ये आहे. ज्यामुळे निओब्लॅडरची कार्यक्षमता अधिक वाढते. याच्या आकाराची रचना वेगळी असून मूत्र साठविणे आणि प्रवाहासाठी मदत होते. याचा आकार दिसायला बेडकासारखा असतो. ही रचना एक कमी दाबाच्या साठवणूक जागेसारखे काम करते. मूत्र साठविण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी हा इष्टतम आकार आहे. या सुधारित निचरा क्षमतेसह मूत्र साठणे आणि मूत्रमार्गातील वरच्या भागात होणाऱ्या बिघाडाचा धोका कमी होतो. या तंत्रामुळे चांगले परिणाम प्राप्त होऊ शक्तात आणि जीवनाची गुणवत्ता वाढू शकते.

कर्करोगानंतर पूर्णपणे मूत्राशय काढून टाकलेल्या रुग्णाला ”फ्रॉग निओब्लॅडर” तंत्रामुळे स्टोमा/युरिनरी बॅग्सपासून मुक्ती

मुत्राशयाचा कर्करोग असलेल्या व रॅडिकल सिस्टेक्टोमी झालेल्या 68 वर्षीय पुरूष रूग्णाला फ्रॉग निओब्लॅडर तंत्रामुळे स्टोमा/युरिनरी बॅग्सपासून मुक्ती मिळाली आहे. विश्वराज हॉस्पिटल, लोणी येथील डॉ.संजय धनगर यांच्या नेतृत्वाखालील टीमने फ्रॉग निओब्लॅडर तंत्रासह निओब्लॅडर प्रक्रिया यशस्वीरित्या केली. याबाबत अधिक माहिती देताना डॉ.संजय धनगर म्हणाले की, हे 68 वर्षीय पुरूष रूग्ण आमच्याकडे 8 महिन्यांपूर्वी आले होते, त्यावेळी लघवीतून रक्त येणे, लघवी होण्यास त्रास होणे आणि 5-6 महिन्यांपासून लघवीत रक्ताच्या गुठळ्या होणे अशा गंभीर समस्या होत्या. विविध चाचण्यांद्वारे त्यांना मुत्राशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर बायोप्सीमध्ये ट्युमरचा प्रकार आणि खोली जाणून घेण्यात आली.ट्युमर कमी करण्यासाठी त्यांच्यावर केमोथेरपी करण्यात आली आणि त्यानंतर मुत्राशय काढून टाकण्यासाठी रॅडिकल सिस्टेक्टोमी ही प्रक्रिया करण्यात आली.

डॉ.धनगर पुढे म्हणाले, मुत्राशय काढल्यानंतर शल्यचिकित्सकांना रूग्णाच्या शरीरात मूत्र साठविण्यासाठी आणि बाहेर काढून टाकण्यासाठी एक पर्यायी मार्ग तयार करणे आवश्यक असते. स्टोमा हा त्यातील एक पर्याय आहे, ज्यामध्ये ओटीपोटात एक लहान छिद्र तयार केले जाते, आणि शरीरातील मूत्र हे एका कलेक्शन बॅगमध्ये साठवून बाहेर टाकले जाऊ शकते. मात्र त्यातील दुसरा पर्याय हा निओब्लॅडर तयार करणे असून यामुळे रूग्णांना अधिक चांगले जीवनमान मिळू शकते. या रूग्णाच्या बाबतीत आम्ही फ्रॉग निओब्लॅडर तंत्राचा पर्याय निवडला. आज या प्रक्रियेला तीन महिने झाले असून त्यांचे लघवीवरचे नियंत्रण दिवसेंदिवस सुधारत आहे. पूर्ण नियंत्रणाला 1 ते 2 वर्षे लागू शकतात. ते आता सामान्य आयुष्य जगत आहेत. युरिन बॅगशिवाय ते बाहेर जाऊ शकतात आणि सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतात. अर्थात पुर्नप्राप्तीच्या प्रवासात नियमित पाठपुरावा आणि प्रशिक्षण महत्त्वाचे असते. काही रूग्णांच्या बाबतीत अधूनमधून कॅथेटरायझेशनची गरज पडू शकते किंवा काही समस्या अधूनमधून उद्भवू शकतात. म्हणूनच निओब्लॅडर प्रक्रिया झालेल्या रुग्णांनी संयम बाळगणे हे गरजेचे आहे. सामान्य दिनचर्या पर्यंत पोहचण्यासाठी कुटुंबाचा आधार, जीवनशैली, आहारात बदल, हायड्रेशन, नियमित पाठपुरावा आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे महत्त्वाचे ठरते.

डॉ.संजय धनगर म्हणाले की,आजवर आम्ही अशा प्रकारच्या अनेक निओब्लॅडर प्रक्रिया केल्या असून त्याचे परिणाम चांगले दिसून येत आहेत व रूग्णांमध्ये जीवनमान सुधारले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments