पुणे : दिनांक १ जून हा कै. गोनीदांचा स्मृतिदिन असून इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने ‘ दुर्गदिन ‘ म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या ‘आठवणीतील आप्पा -बाबा’ या कार्यक्रमात गो.नी. दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या दुर्गभ्रमंतीच्या आठवणींचा पट उलगडला जाणार आहे. ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक डॉ.मिलिंद पराडकर गोनीदांच्या सहवासातील सुवर्णक्षण जिवंत करतील तर जडणघडण मासिकाचे संपादक डॉ.सागर देशपांडे बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृती जागृत करतील. हा कार्यक्रम रविवार दि. १ जून रोजी सायंकाळी ६ वाजता सदाशिव पेठेत ,पेरुगेट भावे हायस्कूल च्या प्र.ल. गावडे सभागृहात होणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.
सुमारे ७०-८० वर्षा पूर्वी जेव्हा किल्ल्यांवर जाण्यासाठी मार्गदर्शक पुस्तके, नकाशे काही नव्हते तेव्हा डोंगर राने तुडवत, खडतर प्रवास करत या दोघांनी शिवचरित्रातील धारातीर्थे धुंडाळली. गतकालीन इतिहासाच्या वैभवशाली पाऊलखुणांचे विलोभनीय दर्शन घेतले. विशेष म्हणजे दोघांच्याही लेखणीवर सरस्वती प्रसन्न होती. आपल्या प्रासादिक लेखनातून हे महाराष्ट्राचे गौरवशाली दुर्गवैभव त्यांनी समाजापर्यंत पोचवले. त्यानंतरच्या कित्येक पिढ्या आप्पा आणि बाबांच्या पायवाटेवरून चालत गडकोटांना भेट देत राहिल्या.
मोहन शेटे म्हणाले, महाराष्ट्रातील ऐतिहासिक दुर्ग हे शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे जिवंत साक्षीदार आहेत. ती आमची प्रेरणास्थाने आहेत. मात्र कधी कधी पिकनिक स्पॉट सारखी किल्ल्यांवर हुल्लडबाजी करणारी तरुणाई पाहिली की खंत वाटते. नव्या पीढीच्या मनात या गडकोटांबद्दल आत्मियता जागी करणे ही काळाची गरज आहे.आणि म्हणून गोनीदा – बाबासाहेबांनी केलेल्या दुर्गप्रेमाच्या संस्कारांची पुन्हा उजळणी केली पाहिजे


