रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन ह्यांच्या मार्फत देण्यात येणारे परिवर्तन पुरस्कार प्रदान कार्यक्रम नुकताच पार पडला. ह्या वर्षीचे पुरस्कार माजी प्रांतपाल रवी धोत्रे ह्यांच्या हस्ते वैद्यकीय विभागात बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ पंकज सुगावकर ह्यांना तर कला व क्रिडा विभागातील पुरस्कार महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड ह्यांना देण्यात आले. सेवेच्या माध्यमातून मोठे परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्ती व संस्था ह्यांना हा पुरस्कार देण्यात येतो असे पुरस्कार संयोजक रोटेरीयन सुदिन आपटे ह्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील, विशेषतः मराठवाड्यातील, जन्मापासून हृदयरोग असलेल्या साडेसात हजारांहून अधिक बालकांवर मोफत अथवा माफक दरात शस्त्रक्रिया आदी उपचार केल्याबद्दल डाॅ सुगावकर ह्यांना गौरविण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून सोळा जिल्ह्य़ातील सव्वा लाखांहून जास्त बालकांचे त्या त्या जिल्ह्य़ात जाऊन 2 डी एको निदान करून ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना पुण्यात आणुन डाॅ सुगावकरांनी ह्या शस्त्रक्रिया केल्या. पुरस्काराचा स्विकार करताना डाॅ सुगावकरांनी रोटरी प्रिस्टिन चे आभार मानले व पेशंट बद्दलची आस्था आणि सेवेची जबाबदारी ह्या मुळे हे कार्य होऊ शकले असे आवर्जून सांगितले.
शालेय शिक्षणा बरोबरच शारीरिक शिक्षणाला महत्त्व देऊन मुलांची, तरूणांची क्रीडा क्षेत्रातील प्रगती केल्याबद्दल महाराष्ट्रीय मंडळाला पुरस्कार देण्यात आला. गेल्या शंभर वर्षांत मंडळाने दिलेल्या क्रिडा नैपुण्याने हजारो खेळाडू घडले ज्यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. पुरस्काराचा स्विकार करताना संस्थेच्या श्रीमती नेहा दामले ह्यांनी कै शिवरामपंत दामले ह्यांचा शारीरिक शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन विशद केला. तसेच संस्थेच्या ह्या परिवर्तनातून क्रीडाक्षेत्रातील भरीव कामगिरी बरोबर कित्येक सैनिक व लष्कर अधिकारी निर्माण केले हे आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रोटेरीयन रवी धोत्रे ह्यांनी रोटरी समाजात सेवेच्या माध्यमातून ज्या व्यक्ती व संस्था परिवर्तन करतात त्यांचे महत्त्व अधोरेखित केले तसेच दोन्ही पुरस्कारार्थींच्या कामाचे कौतुक केले,महत्व सांगितले.
रोटरी प्रिस्टिनच्या अध्यक्षा शिल्पा भोसेकर ह्यांनी रोटरी प्रिस्टिनची माहीती दिली व पुढील वर्षाच्या अध्यक्ष सुनया आपटे ह्यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.


