एक्वस लिमिटेड (“एक्वस”) ही ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ उपक्रमांतर्गत कार्यरत असलेली उत्पादन कंपनी असून, ती एरोस्पेस आणि ग्राहक वस्तू क्षेत्रांसाठी संपूर्णपणे अनुलंब एकत्रीकरण अचूक उत्पादन (प्रीसिशन मॅन्युफॅक्चरिंग) प्रणाली पुरवते. या कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) गुप्त पद्धतीने भांडवली बाजार नियंत्रक सेबी आणि संबंधित शेअर बाजारांमध्ये सादर केला आहे. या संदर्भातील सार्वजनिक जाहिरात 3 जून 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती.
एक्वस लिमिटेड च्या संचालक मंडळाने नुकताच एक ठराव मंजूर केला असून, त्यानुसार कंपनीचा दर्जा खासगी कंपनीवरून सार्वजनिक कंपनीमध्ये बदलण्यास आणि “एक्वस प्रायव्हेट लिमिटेड” चे नाव बदलून “एक्वस लिमिटेड” असे करण्यास मान्यता दिली आहे, असे नियामक फायलिंगमध्ये नमूद करण्यात आले आहे.
स्रोत आणि यापूर्वीच्या माध्यम रिपोर्ट्सनुसार, कंपनी सुमारे 200 दशलक्ष डॉलर्सच्या आयपीओची योजना आखत असल्याचे समजते. कंपनीच्या नियामक दस्तऐवजानुसार, या आयपीओमध्ये नवीन इक्विटी शेअर्सचा समावेश असणार असून, काही भाग ऑफर फॉर सेल (ओएफएस) स्वरूपात असेल. मात्र, कंपनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल, जेएम फायनान्शियल आणि आयआयएफएल कॅपिटल यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही वृत्त आहे.
एक्वसला गेल्या काही वर्षांत कंपनीच्या प्रवर्तकांकडून व्यवसाय विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर इक्विटी गुंतवणूक मिळाली आहे. याशिवाय, कंपनीने अॅमिकस कॅपिटल, अमांसा कॅपिटल, स्टेडव्ह्यू कॅपिटल, कॅटामारन (इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा कौटुंबिक गुंतवणूक कार्यालय), स्पार्टा ग्रुप आणि देश देशपांडे यांचे गुंतवणूक कार्यालय अशा जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे, असे सार्वजनिक माहितीवरून स्पष्ट होते. कंपनीने पीई गुंतवणूकदारांकडून सीसीपीएस (कंपल्सरिली कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स) च्या स्वरूपात सुमारे ₹586 कोटींची बाह्य निधी उभारणी केली आहे. ही रक्कम व्यवसाय विस्ताराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे केअरएज रेटिंग्जच्या 5 जुलै 2024 रोजीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न सुमारे ₹988 कोटी होते (नियामक फायलिंगनुसार), तर एकूण ऑपरेशनल उत्पन्न ₹970 कोटी होते, असे केअरएज रेटिंग्जच्या अहवालात नमूद आहे. कंपनीचा भांडवली प्रकल्प (कॅपेक्स प्रोजेक्ट) यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आणि एरोस्पेस व्यवसायातील सातत्यपूर्ण ऑर्डर इनफ्लोच्या पार्श्वभूमीवर, केअरएज रेटिंग्जने अंदाज वर्तविला आहे की, कंपनीचे उत्पन्न जवळच्या आणि मध्यम कालावधीत 45% चक्रवाढ वार्षिक दराने (सीएजीआर) वाढेल.
कंपनीला आर्थिक लवचिकता (फायनान्शियल फ्लेक्सिबिलिटी) ही प्रवर्तकांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे मिळते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मेलीगेरी यांना एरोस्पेस क्षेत्रात अनेक दशकांचा अनुभव असून, ते क्वेस्ट ग्लोबल इंजिनीअरींग प्रायव्हेट लिमिटेडचे सह-संस्थापकही राहिले आहेत.
कंपनीने अलीकडेच जीन-मायकेल कॉन्डॅमिन यांची एरोस्पेस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. राजीव कौल हे एक्वस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) आहेत.
एक्वस ही कंपनी भारत, फ्रान्स आणि अमेरिका या तीन देशांमध्ये उत्पादन सुविधा चालविते, जेणेकरून विविध औद्योगिक क्षेत्रांतील जागतिक ग्राहकांना पुरवठा साखळी कार्यक्षमतेसह सेवा दिली जाऊ शकेल. याशिवाय, भारतातील कर्नाटकमध्ये कंपनीची तीन उत्पादन क्लस्टर्स – बेलगावी, हुबळी आणि कोप्पळ येथे कार्यरत आहेत. माध्यम अहवालांनुसार, एक्वस ही कंपनी आता टाटा इलेक्ट्रॉनिक्स, मदरसन ग्रुप आणि जेबिल यांच्यासोबत अॅपल उत्पादनांसाठी यांत्रिक घटक (मेकॅनिकल कम्पोनंट्स) तयार करत आहे.


