पुणे दिनांक १४ जून २०२५
अग्रमानांकित संतोष वाकराडकर यांनी अपेक्षेप्रमाणे शारदा स्पोर्ट्स सेंटरने आयोजित केलेल्या शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील प्रौढांच्या चाळीस वर्षावरील वयोगटाच्या एकेरीत विजेतेपद पटकावले आणि आपले अव्वल मानांकन सार्थ ठरविले. प्रौढांच्या दुहेरीत कृपाल देशपांडे यांनी ओंकार जोग यांच्या साथीत अजिंक्यपद पटकावले.
या स्पर्धेस शारदा ग्रुप व डेक्कन डाईज अँड केमिकल्स यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे दिनांक १५ जून पर्यंत सुरू राहणार आहे. या मोसमातील ही पहिलीच मानांकन स्पर्धा आहे.
प्रौढांच्या चाळीस वर्षांवरील एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित संतोष वाकराडकर (टॉस अकादमी) यांनी आपल्याच क्लबचे सहकारी कृपाल देशपांडे यांना ११-४,११-७,७-११,११-६ अशा गेम्सने पराभूत केले. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत प्रेक्षकांची मने जिंकली. कृपाल यांनी एक गेम जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली होती मात्र वाकराडकर यांनी महत्त्वाच्या क्षणी खेळावर नियंत्रण मिळवले आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
उपांत्य फेरीत वाकराडकर यांनी ओंकार जोग यांचा ११-८,११-७, ११-६ असा सरळ तीन गेम्स मध्ये पराभव केला तर द्वितीय मानांकित कृपाल देशपांडे यांनी स्वानंद बेडेकर यांच्यावर मात केली. अटीतटीने झालेला हा सामना देशपांडे यांनी ११-६,१५-१३,६-११, ८-११,११-५ असा जिंकला.
वाकराडकर यांची दुहेरी मुकुटाची संधी मात्र हुकली. दुहेरीमध्ये मात्र कृपाल व ओंकार या जोडीने वाकराडकर व दीपक कदम यांचा ११-४,११-८,१०-१२,६-११,१५-१३ असा पराभव केला. दोन्ही जोड्यांनी अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडवित सामना शेवटपर्यंत रंगतदार केला. मात्र कृपाल व ओंकार यांनी शेवटच्या गेममध्ये अचूकता दाखवली आणि विजयश्री खेचून आणली.


