Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा स्त्री रूग्णालय,अमरावती व पुण्यातील एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे 45...

जिल्हा स्त्री रूग्णालय,अमरावती व पुण्यातील एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे 45 दिवसांच्या बाळाची दृष्टी वाचविण्यात यश

पुणे,७ जुलै t2025 : रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी ही स्थिती असलेल्या व नेत्र शस्त्रक्रियेची तातडीने गरज असलेल्या 45 दिवसांच्या मुलीची दृष्टी वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. जिल्हा स्त्री रूग्णालय,अमरावती येथील प्रशासन व कर्मचारी आणि पुण्यातील एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल यांची तत्परता व सांघिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.

 

 

अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयातील विशेष नवजात चिकित्सा विभागात (एसएनसीयू – स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट) येथे 45 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या व 990 ग्रॅम वजन असलेल्या बाळाची रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी साठी 12 जून रोजी चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे बाळाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी धावपळ सुरू झाली,कारण ही शस्त्रक्रिया अगदी 2 ते 3 दिवसांत होणे गरजेचे असते.रेटिनोपॅथी ऑफ प्री-मॅच्युरिटी (आरओपी) ही मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांच्या डोळ्यांची एक गंभीर स्थिती आहे.जर याचे लवकर निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व येऊ शकते.ही स्थिती 34 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या आणि 2000 ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या नवजात शिशुंमध्ये दिसून येते.यावर जर उपचार घेतले नाहीत तर,डोळ्याचा पडदा (रेटिना) हा आजूबाजूच्या उतींपासून दूर जातो (रेटिनल डिटॅचमेंट). यामुळे दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो किंवा अंधत्व येऊ शकते.

 

पण वैद्यकीय स्थिती हेच फक्त आव्हान नव्हते.बाळाचे पालक आदिवासी समुदायातील असल्याने त्यांची भाषा इतरांना कळत नव्हती.त्यांची आर्थिक परिस्थितीही नव्हती आणि सरकारी योजनांमध्ये पात्र ठरण्यायोग्य कागदपत्रेही नव्हते,मात्र वेळ हा महत्त्वाचा होता.स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती स्त्री जिल्हा रूग्णालयातील एसएनसीयू विभागाच्या प्रमुख डॉ.प्रीती इंगळे यांनी तातडीने एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ.सुचेता कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला व मोफत उपचार कराल का हे विचारले.डॉ.कुलकर्णी यांनी तात्काळ होकार देत बाळाला तातडीने पुण्याला पाठविण्यास सांगितले.मात्र पालकांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची असल्याने प्रवासाचे तिकीट काढण्यासाठीही पैसे नव्हते. जिल्हा स्त्री रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाळाच्या वडिलांचे समुपदेशन सुरू केले पण ते पैसे नसल्याने तयार नव्हते.त्यांचे गाव देखील खूप लांब असून तिथे जाण्याकरिताही पैसे नाहीत असे ते सांगत होते.जिल्हा प्रशासनातील प्रकाश खडके यांनी मेळघाटातील वरिष्ठ अधिकारी डॉ.तिलोत्तमा वानखेडे व काटकुंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.ऐश्वर्या वानखेडे यांच्याशी संपर्क साधला.यांनी ताबडतोब पैशाची मदत करत 5000 रूपये डिजिटल माध्यमातून पाठविले.12 जून रोजी रात्री 10.45 ला असलेली ट्रेन पालक तयार नसल्यामुळे त्यांची ट्रेन सुटली.मात्र या सर्व लोकांनी आपले प्रयत्न सुरू ठेवत 13 जूनचे तिकीट काढून बाळाच्या वडिलांना जाण्यास तयार केले.या लोकांनी त्यांना ट्रेनमध्ये स्वत: जाऊन बसविले. 14 जून रोजी सकाळी 7 वाजता ते पुणे स्टेशनला पोहचले आणि तिथे एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमधील श्री.विष्णू सर यांनी रिक्षाची व्यवस्था केली.काही वेळातच बाळावर शस्त्रक्रिया सुरू झाली व यशस्वी झाली.त्याच दिवशी श्री.विष्णू यांनी सायंकाळी 6.30 वाजता त्यांना पुन्हा ट्रेन मध्ये बसवून दिले.टी.टी.सोबत बोलून त्यांची व्यवस्थित बसण्याची व्यवस्था केली आणि बाळाला परत अमरावती जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.आता बाळाची परिस्थीिती चांगली आहे.

 

यासंदर्भात बोलताना एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ.सुचेता कुलकर्णी म्हणाल्या की,या बाळाच्या बाबतीत रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटीची अधिक आक्रमक स्थिती होती.एरवी आरओपी या स्थितीत 3 ते 4 दिवसात शस्त्रक्रिया करावी लागते,मात्र आक्रमक स्थितीत 1 ते 2 दिवसात करणे गरजेचे असते,नाहीतर कायमचे अंधत्व येऊ शकते,म्हणूनच अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयाने केलेली धावपळ ही अत्यंत महत्त्वाची आहे.एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलचे आरओपी चाचण्यांसाठी मोफत सेवा सध्या पुणे आणि सातारा येथील दोन जिल्हा रूग्णालयात सुरू आहे.दुर्गम भागातील लोकांना अशा तातडीच्या परिस्थितीत अनेक वेळा आव्हानांना सामोरे जावे लागते,म्हणूनच त्यांच्या पर्यंत पोहचून अशा सेवा तिथेच उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments