वेदांता लिमिटेडने आपल्या 60व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) विकासाच्या पुढील टप्प्याचा दृष्टिकोन सादर केला. यावेळी अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी डीमर्जर, डायव्हर्सिफिकेशन आणि डिलेव्हरेजिंग या तीन स्तंभांवर आधारित परिवर्तन आराखडा मांडला. मजबूत आर्थिक स्थिती, विक्रमी शेअरहोल्डर परतावा आणि महत्वपूर्ण खनिजे तसेच ऊर्जा परिवर्तन धातू यांचा वाढता पोर्टफोलिओ यांच्या जोरावर वेदांताची वाढ ही भारताच्या आर्थिक आणि ऊर्जा आकांक्षांशी सुसंगत आहे. वेदांताने 1000 डीप-टेक स्टार्ट-अप्सची उभारणी करणार असल्याचेही जाहीर केले. तसेच, भारतातील पहिले औद्योगिक झिंक आणि अॅल्युमिनियम पार्क्स स्थापन करण्याची आपली योजनाही कंपनीने पुन्हा अधोरेखित केली.
AGM दरम्यान बोलताना अध्यक्ष श्री. अनिल अगरवाल म्हणाले, “आमचे डीमर्जर, डायव्हर्सिफिकेशन आणि डिलेव्हरेजिंगचे 3D धोरण यातून आम्ही आमचा आकार दुप्पट करू शकू आणि आमच्या सर्व भागधरकांसाठी कमाल मूल्य खुले करू.”
जगभरात स्त्रोत राष्ट्रीयीकरण वाढताना दिसत आहे. अनिल अगरवाल यांनी भारताच्या आर्थिक भविष्यामध्ये विशेषतः EVs आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या ऊर्जा परिवर्तन तंत्रज्ञान आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये नैसर्गिक संसाधनांची भूमिका आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताची भूगर्भ रचना कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या संसाधन समृद्ध देशांच्या तोडीची असूनही केवळ 25 टक्केच भाग शोधला गेलेला आहे, असे नमूद करत त्यांनी सांगितले की महत्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात जलद प्रगतीसाठी ही योग्य वेळ आहे.
ते पुढे म्हणाले, “ही केवळ विकासाची कथा नाही, ही भारताच्या आकांक्षांची पूर्तता होण्याची कहाणी आहे. आमचे धोरण पूर्णपणे विकसित भारताच्या गरजांशी सुसंगत आहे.”
वेदांता या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या तयार आहे. कंपनीने भारतभरात 10 क्रिटिकल मिनरल ब्लॉक्स मिळवले असून खाजगी क्षेत्रातील कोणत्याही कंपनीद्वारे मिळवलेल्या सर्वात मोठ्या ब्लॉक्सपैकी एक आहेत. यामुळे वेदांता एक क्रिटिकल मिनरल्स, एनर्जी ट्रान्झिशन मेटल्स, एनर्जी आणि टेक्नोलॉजी उद्योगसमूहामध्ये रूपांतरित होत असल्याचे स्पष्ट होते. कंपनी जगातील पहिले औद्योगिक झिंक पार्क आणि भारतातील सर्वात मोठे अॅल्युमिनियम पार्क उभारत आहे. त्यायोगे भारतातील धातूविषयक क्रांतीची सुरुवात करत हजारो एमएसएमईजना प्रोत्साहन आणि लाखो रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
AGM मधील एक महत्त्वाचा ठळक मुद्दा म्हणजे कंपनीची डीमर्जर योजना. 99.5 टक्क्यांहून अधिक समभागधारक आणि वित्तपुरवठादार यांची संमती मिळाल्यानंतर वेदांता आपल्या ‘व्हॅल्यू अनलॉक’ म्हणजेच मूल्य खुले करण्याच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, समभागधारकांना नव्याने डीमर्ज झालेल्या चार युनिट्समध्ये समभाग मिळतील. प्रत्येक व्यवसायाकडे 100 अब्ज डॉलर व्यवसाय होण्याच्या क्षमतेसह स्वतःचे धोरणात्मक ध्येय, गुंतवणूकदार आधार आणि वाढीचा मार्ग असेल.
अध्यक्ष अगरवाल म्हणाले, “प्रत्येक व्यवसायाला नव्याने लक्ष केंद्रीत करता येईल, नवीन गुंतवणूकदार मिळतील आणि स्वतःची पूर्ण क्षमता गाठण्याची अद्वितीय संधी मिळेल.”
दीर्घकालीन धोरणाच्या अनुषंगाने वेदांता भावी औद्योगिक चॅम्पियन्स तयार करत आहे. कंपनीने डीप-टेक क्षेत्रातील 1000 स्टार्टअप्ससोबत भागीदारी करण्याची योजना जाहीर केली असून हा भारतातील उत्पादन क्षेत्रातील सर्वात मोठ्या औद्योगिक इनक्यूबेटर प्लॅटफॉर्मपैकी एक ठरणार आहे. या उपक्रमांचा उद्देश भविष्यातील कामकाजासाठी सज्ज राहणे आणि भारताच्या आत्मनिर्भरतेच्या व आर्थिक नेतृत्वाच्या व्यापक उद्दिष्टांना पाठबळ देणे हा आहे.
श्री. अगरवाल यांनी शाश्वतता, तंत्रज्ञान आणि सामाजिक विकासासाठी कंपनीच्या बांधिलकीचाही पुनरुच्चार केला. हिंदुस्तान झिंकला जागतिक धातू आणि खाणकाम क्षेत्रात प्रथम क्रमांक देण्यात आला आहे, तर वेदांता अॅल्युमिनियम S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट 2024 मध्ये अॅल्युमिनियम विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने 2050 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याची बांधिलकी जपली आहे. कंपनीचा प्रमुख सामाजिक प्रभाव उपक्रम ‘नंद घर’ ने आता 15 राज्यांमध्ये 8,500 केंद्रांची संख्या पार केली असून बालविकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.
श्री. अगरवाल यांनी भारतात एक जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या आपल्या दीर्घकाळच्या स्वप्नाचाही उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, “ही आमच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांची आणखी एक पायरी असेल. वेदांता युनिव्हर्सिटी ही हार्वर्डसारख्या संस्थांपासून प्रेरणा घेतलेली एक जागतिक दर्जाची संस्था असेल. ही संस्था भारतात केवळ जागतिक दर्जाचे संशोधन व शिक्षण घेऊन येईल एवढेच नाही तर देशातच पुढील पिढीतील शास्त्रज्ञ, अभियंते आणि नेते घडवेल.”
2024–25 आर्थिक वर्षात वेदांताची कामगिरी मजबूत राहिली असून कंपनीने 1,50,725 कोटी रु. चे उत्पन्न व 43,541 कोटी रु. चा EBITDA नोंदवला आहे. NIFTY 100 मधील आघाडीच्या संपत्ती निर्मात्यांपैकी एक म्हणून ती उदयास आली असून 87 टक्के एकूण शेअरहोल्डर परतावा दिला आहे. हिंदुस्तान झिंक 12,000 कोटी रु.च्या गुंतवणुकीसह 2.5 लाख टन क्षमतेचे इंटिग्रेटेड स्मेल्टिंग कॉम्प्लेक्स उभारत आहे. ऑइल आणि गॅस क्षेत्रात कर्नने सात नवीन OALP ब्लॉक्स मिळवले असून उत्पादन दुप्पट करून 3 लाख बॅरल प्रति दिवस करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अॅल्युमिनियमची उत्पादन क्षमता 31 लाख टनांपर्यंत वाढवली जात असून 30 लाख टन क्षमतेचा एक नवीन ग्रीनफील्ड स्मेल्टर उभारण्याचीही योजना आहे.
अध्यक्षांनी शेवटी वेदांताच्या 1 लाख कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेतली. त्यांनी सांगितले की कंपनीच्या एकूण कर्मचार्यांपैकी 22 टक्के आणि नेतृत्व पातळीवर 28 टक्के महिलांचा समावेश असून 2030 पर्यंत महिला प्रतिनिधित्व 30 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.


