भारत, ७ ऑगस्ट २०२५ – देशभरात राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर, टाटा समूहाचा तनेरा ब्रँड आपल्या अमूल्य वस्त्रपरंपरेच्या जतनासाठीची बांधिलकी अधिक दृढ करत आहे. यानिमित्ताने ‘तनेरा’ने आपल्या उत्पादनांमध्ये जीआय (भौगोलिक निर्देशांक) टॅग लागू करण्याची घोषणा केली आहे.
भारतात जीआय प्रमाणपत्र मिळवणाऱ्या मोजक्या ब्रँड्सपैकी एक असलेला तनेरा हा जीआय प्रमाणपत्र असलेला हातमाग साड्यांची शृंखला सादर करणारा अग्रगण्य ब्रँड ठरला आहे. यामध्ये सुरुवातीला बनारसी, चंदेरी आणि महेश्वरी या प्रमुख वस्त्रकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे तनेराने हातमागावर वीणकाम करणाऱ्या कुशल कारागिरांना, त्यांच्या विशिष्ट प्रदेशांना, आणि त्यांच्या अनेक पिढ्यांनी जपलेल्या परंपरांना योग्य तो सन्मान दिला आहे. या उपक्रमामध्ये प्रामाणिकतेची आणि नैतिक कारागिरीची मूलभूत भावना आहे. यामुळे ग्राहक आणि देशभरातील विणकर समुदाय यांच्यामध्ये एक सखोल नाते निर्माण होईल आणि भारताची समृद्ध विणकाम परंपरा अधिक बहरेल.
‘तनेरा’च्या तत्त्वज्ञानात प्रामाणिकपणा ही नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. हातमागाचे चिन्ह, रेशीम आणि जरी यांची प्रमाणपत्रे यांपासून ते प्रत्येक उत्पादनात त्या बांधिलकीचे प्रतिबिंब दिसून येते. आता ‘जीआय टॅग’च्या समावेशामुळे ही विश्वासार्हता अधिक दृढ होत आहे. हे टॅग ग्राहकांना उत्पादनाची खरी उगमभूमी दर्शवतात आणि ‘तनेरा’च्या ‘भारताची श्रेष्ठता एका छताखाली’ या दृष्टीकोनाला मूळत्व आणि उद्देश यांच्यासह नवसंजीवनी देतात.
या उपक्रमाच्या अंतर्गत तनेरा आपले विक्रेते भागीदार आणि कारागिरांचे समूह यांच्यासोबत काम करत आहे. त्यांना जीआय (भौगोलिक निर्देशांक) प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदोपत्री मदत, कायदेशीर मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी पाठबळ देऊ करीत आहे. यांत्रिक उत्पादनांनी व्यापलेल्या आणि कारागिरांच्या कौशल्याला ओळख कमी मिळणाऱ्या आजच्या डिझाईन विश्वात, ‘तनेरा’चा हा प्रयत्न हातमागाच्या परंपरांची सुभगता आणि शाश्वत सौंदर्य जपण्यासाठीची खोलवरची बांधिलकी दर्शवतो.
हातमाग साड्यांच्या विक्रीसाठी पारदर्शक आणि प्रमाणित दृष्टीकोन तनेरा पुढे आणत आहे. ‘तनेरा’च्या साड्यांमध्ये अनेक प्रामाणिकतेची विश्वासार्ह चिन्हे असतात, उदा. हातमाग चिन्ह (हॅंडलूम मार्क), सिल्क मार्क, जरीचे प्रमाणपत्र, खादीचे प्रमाणपत्र आणि पश्मिना प्रमाणपत्र. आता या यादीत ‘जीआय टॅग’चाही समावेश झाला आहे. त्यामुळे प्रत्येक साडीच्या विणीचा उगम तिच्या मूळ प्रादेशिक ठिकाणाशी आणि त्या कलेला पिढ्यानपिढ्या जपणाऱ्या कारागिरांशी जोडला गेल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध होते.
या महत्त्वपूर्ण टप्प्याविषयी ‘तनेरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबुज नारायण म्हणाले, “राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त ‘तनेरा’मध्ये आम्ही भारतीय विणकाम परंपरांचे संरक्षण आणि कारागिर समुदायांचा सशक्तीकरण यासाठी आणखी एक अर्थपूर्ण पाऊल उचलले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. कारागिरी केंद्रांशी भागीदारी करून आणि जीआय-टॅग असलेल्या साड्या व अन्य प्रमाणित विणकाम सादर करून, आम्ही एक पारदर्शक पुरवठा साखळी उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा प्रयत्न कारागिरांना सक्षम करेल आणि ग्राहकांना विचारपूर्वक, जागरूक निवड करण्यास मदत करेल. या उपक्रमाद्वारे, आम्ही सौंदर्यापलीकडे जाणाऱ्या साड्या सादर करत राहू. या साड्या प्रामाणिकता साकारतात, वारशाची जबाबदारी पेलतात आणि भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे जागतिक प्रतिनिधित्व करतात.”
तनेरा भारताच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची ओळख ठरलेल्या पारंपरिक ज्ञानपद्धतींचे जतन करण्यासाठी हातमाग केंद्रांशी सक्रीय भागीदारी करत आहे. या उपक्रमातून कारागिर समुदायांना त्यांच्या कौशल्याची योग्य दखल आणि सन्मान मिळावा, हे सुनिश्चित केले जात आहे. जीआय-टॅग असलेली साडी म्हणजे भारताच्या सांस्कृतिक भूगोल, इतिहास आणि हस्तकलेचा स्पर्श करणारा समृद्ध ठेवा! अशा साड्या केवळ परंपरेचे रक्षण करणाऱ्या नसतात. हाताने विणल्या गेलेल्या या साड्यांची रचना अशी असते की त्या शरीरास मोकळेपण देतात, टिकाऊ असतात आणि अनेक पिढ्यांपर्यंत चालतात. सौंदर्य आणि आराम यांचा अचूक संगम असलेली ही साडी शाश्वत आणि सुसंस्कृत सौंदर्याची निशाणी बनते.
सध्या तनेरा जवळपास १० इतर प्रादेशिक केंद्रांत जीआय-टॅग मिळवण्यासाठी प्रक्रिया करत आहे, आणि लवकरच त्या विणकामांचाही समावेश त्यांच्या साड्यांच्या संग्रहात केला जाणार आहे. या प्रत्येक नव्या समावेशातून तनेरा आपल्या दृष्टीकोनाच्या आणखी जवळ पोहोचत आहे. हा दृष्टीकोन आहे प्रामाणिक आणि प्रादेशिक वैशिष्ट्य असलेल्या हातमाग साड्या आधुनिक भारतीय महिलेला सहज उपलब्ध करून देण्याचा, आणि त्या प्रक्रियेत संपूर्ण कारागीर व्यवस्थेला बळकटी आणण्याचा!
या राष्ट्रीय हातमाग दिनी, प्रत्येक धाग्यात गुंफलेल्या कथांचे, मातीतल्या सुगंधाचे आणि आत्म्याच्या स्पर्शाचे अनुभव घेण्याचे आमंत्रण तनेरा ग्राहकांना देत आहे.


