पुणे, दि. 11 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचा (बीएनसीए) ३१वा वर्धापन दिन विविध उपक्रमांमधून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने २०२४-२५ मध्ये विद्यावाचस्पती (पी.एचडी.), पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) आणि पदवी अभ्यासक्रम (ग्रॅजुएशन) पूर्ण करणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थिनींना बीएनसीए तर्फे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात प्रमाणपत्र घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय बीएनसीएच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थिनींच्या विद्यार्थी परिषदेत नेमणुका करण्यात आल्या. त्यांना प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप व प्राध्यापकांच्या हस्ते बॅजेस सेरीमनी मधून समारंभपूर्वक बॅजेस प्रदान करण्यात आले.
बीएनसीएमधील प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचे (आयआयए) पुणे विभागाचे अध्यक्ष आर्किटेक्ट विकास आचलकर आणि प्रसिद्ध वास्तूरचनाकार संदीप महाजन यांच्यासह बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, तसेच महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी इंजिनीयर जयंत इनामदार आणि बीएनसीएतील परीक्षा विभागाच्या प्रमूख डॉ. धरती सोटे उपस्थित होते. डॉ. अमृता गरूड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त बीएनसीए तर्फे तयार करण्यात आलेला ‘मानवी बांधकाम पर्यावरण आणि त्यापलीकडीलः आव्हाने आणि संधी’ (बिल्ट एनव्हायरमेंट अॅण्ड बियाँड चॅलेंजेस अॅण्ड अपॉर्च्यूनिटी) या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या शोध निबंधांवरील संकलित प्रतीचे प्रकाशन झाले. त्यावेळी या परिषदेच्या निमंत्रक डॉ. वैशाली लाटकर यांच्यासह सहनिमंत्रक डॉ. मीरा शिरोळकर, तसेच डॉ. स्वाती सहस्रबुद्धे आणि प्रा. निशिगंधा साखरदंडे उपस्थित होते.
प्रमाणपत्र देण्याच्या समारंभाच्या निमित्ताने आर्किटेक्ट आचलकर यांनी प्रमाणपत्र घेणाऱ्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आर्किटेक्चर हे इतर क्षेत्रांपेक्षा वेगळे असून त्यामध्ये सुरुवातीला कष्ट व अनुभवाची शिदोरी जमवावी लागते. त्या आधारेच पुढे स्वतःचा व्यवसाय आणि त्यानुसार उत्पन्नात वाढ होत जाते.
त्यामुळेच आपल्या पदवीधर मुलीच्या या क्षेत्राचे स्वरूप लक्षात घेता त्यांची माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांशी तुलना करू नका, त्यांना प्रोत्साहन दिल्याने त्या वेगाने पुढे जाऊन यशस्वी आर्किटेक्ट बनतील.
आर्किटेक्ट महाजन यांनीही आर्किटेक्चर पदवी घेतल्यानंतर भूशास्त्रकला (लॅण्डस्केप), पर्यावरण, तसेच विविध प्रकारच्या इमारतींची कौशल्यपूर्ण रचना (डिझाईन) करण्याची संधी मिळणार असून त्यांचे भविष्य उज्वल आहे, असे स्पष्ट केले.
डॉ. कश्यप यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींना आर्किटेक्चर क्षेत्रात निश्चितच उज्वल भवितव्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आमच्या अभ्यासक्रमात जगभरातील गोष्टींमधील विकास तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर देत विद्यार्थिनींना अद्ययावत ठेवतो. सध्या अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे काळजी करण्याचे कारण नाही. आपण आत्मविश्वास असणारे भारतीय असल्यामुळेच आर्किटेक्चर क्षेत्रातील कामाला व कर्तुत्वाला कोणत्याही मर्यादा नाहीत, याची खात्री बाळगा.
जयंत इनामदार म्हणाले की, पदवीधर झालेल्या विद्यार्थिनींनी आपले लक्ष्य हे आता पुणे, महाराष्ट्र आणि भारत देश असेच ठेवायला हवे. अमेरिकेपेक्षा भारतीय मेंदू हा जास्त प्रगल्भ असून त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा भारतासाठीच व्हायला हवा.


