Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंग्रजीला पायघड्या कशासाठी? संशोधनातून सादर झाला पहिला देखावा

इंग्रजीला पायघड्या कशासाठी? संशोधनातून सादर झाला पहिला देखावा

 

 

गोखलेनगर भागातील सुयोग मित्र मंडळाने ‘इंग्रजी माध्यमाला पायघड्या कशासाठी?’ हा संशोधनातून देखावा सादर केला असून, अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

गोखलेनगर ही पानशेत पूरग्रस्तांची वसाहत सन १९६५ मध्ये विकसित झाली. गरीब आणि मध्यमवर्गीय कर्मचारी आणि कष्टकऱ्यांचा समावेश आहे. बहुतेकांची मातृभाषा मराठी आहे. गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्यासाठी पालकांचा विशेष आग्रह दिसून आला. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शंभर पालकांकडून संशोधनासाठी प्रश्नावली भरून घेण्यात आल्या.

 

आर्थिक प्रगती होईल, फाडफाड इंग्रजी बोलता येईल, उच्च शिक्षण घेणे सोपे जाईल, प्रतिष्ठा वाढेल हे इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे पालकांचे उद्देश होते. परंतु प्रत्यक्षात इंग्रजीतील शिक्षण म्हणजे घोकमपट्टी, इंग्रजी किंवा मातृभाषेवर प्रभुत्व मिळवता आलेले नाही, ज्ञान, आकलन, उपयोजन, निर्मिती, संस्कृती हे गुण फारसे विकसित झाले नाही आणि इतिहास व संस्कृती प्रभावीपणे शिकता आली नाही असे निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आले.

 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, समाजसेवक बाबा आमटे, लष्करप्रमुख मनोज नरवणे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मातृभाषेतून शिक्षण घेऊन जागतिक किर्ती मिळविली. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तरीही गेल्या दोन वर्षांत सुमारे पाचशे मराठी शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखाने वाढली या कडे लक्ष वेधले आहे.

 

इंग्रजीच्या कुबड्या न घेता आपल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देवून नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, जपान आदी देश विकसित झाले. इंग्रजी ही जगातील पहिल्या क्रमांकाची बोलली जाणारी प्रथम भाषा नसून, तिचा क्रमांक तिसरा आहे. तिच्या पाठोपाठ हिंदी भाषेचा नंबर लागतो. बंगाली, पंजाबी, मराठी, तेलगू, तमिळ या सहा भाषांचा पहिल्या वीस भाषांमध्ये समावेश होतो. भारतीय भाषा बोलणाऱ्यांची संख्या इंग्रजी भाषिकांच्या दुपटीहून अधिक असल्याचे निष्कर्ष संदर्भानिशी देण्यात आले आहेत.

 

ब्रिटिश प्रशासनाच्या मदतीसाठी रक्त आणि रंगाने भारतीय असलेल्या पण विचाराने, नैतिकतेने आणि बुध्दीने इंग्रजांसारखी असणारी मनुष्यबळ निर्मिती करण्याचे लॉर्ड मॅकॅलेचे शिक्षणविषयक उद्दिष्ट होते. इंग्रजी माध्यमातून शिक्षण देऊन स्वातंत्र्यानंतरही आपण इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाही. इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यास हरकत नाही, परंतु प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत दिले पाहिजे असे मत या देखाव्याद्वारे अधोरेखित करण्यात आले आहे.

 

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ६० विद्यार्थ्यांसाठी मंडळाने सुसज्ज अभ्यासिका सुवर्ण महोत्सवी वर्षापासून सुरू केली आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमाला, आजीबाईचा भोंडला, ललिता पंचमी, सार्वजनिक दिवाळी, दीपोत्सव, तिकोना गडावर स्वच्छता मोहीम, संक्रांत महोत्सव, मोरांसाठी धान्य संकलन, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात आले.

 

सुमीत दगडे, विश्वजीत भवारी, साक्षांत शिर्सेकर, नील दगडे, साईराज बढे, सार्थक नेटके, अभिषेक पवार, सार्थक धुमाळ, सुयोग देखणे, ओमकार मापुसकर, संतोष चौधरी, समर्थ धुमाळ,अरॉन त्रिभुवन, देवेंद्र मिटकरी यांनी सजावट केली. मुकेश खामकर मंडळाचे अध्यक्ष असून, अक्षय माने, ऋषिकेश माने, मंगेश तडके, शुभम वाईकर, राजू मापुसकर हे प्रमुख पदाधिकारी आहेत. मंडळ यंदा ५१ वे वर्ष साजरे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments