Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorized*जिल्ह्याचे ठिकाण नसूनही काही तालुक्यांना आणि तेथील जुन्या पिढीतील पत्रकारांना राज्यस्तरावरील राजकारणात...

*जिल्ह्याचे ठिकाण नसूनही काही तालुक्यांना आणि तेथील जुन्या पिढीतील पत्रकारांना राज्यस्तरावरील राजकारणात पूर्वीपासून वेगळे स्थान : ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले* *फलटण आणि तेथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांना सर्वोच्च स्थान*

 

फलटण दि. ७ : इचलकरंजी, कराड, फलटण, बारामती, तुळजापूर या शहरांना जिल्ह्याचा दर्जा नाही पण त्या त्या जिल्ह्यांच्या राजकारण, समाजकारण आणि अन्य व्यवस्थेत किंबहुना राज्याच्या राजकारणातही या शहरांना मोठे स्थान असल्याचे आवर्जून सांगत या शहरांमध्ये आपल्या भागाची संपूर्ण माहिती असलेली, तत्कालीन नेत्यांना काही सांगण्याचे नैतिक धैर्य असणारी पत्रकारांची जुनी पिढी होती आणि ते ऐकणारी नेते मंडळी त्यावेळी होती असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक ह.भ.प. युवक मित्र बंडातात्या कराडकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. महादेवराव जानकर, आ. सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन विश्वासराव निंबाळकर, सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ नेते गणपतराव बाबुराव निकम तथा बबनराव निकम, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण शेतमाल सहकारी प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र कृष्णचंद्र भोईटे, दै. ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणीटकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष तथा सातारा जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष हरिष पाटणे, श्री शांतिनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिपक मेहता, शिवसेना फलटण तालुका प्रमुख नानासाहेब तथा पिंटू इवरे, अजय फराटे, आरपीआय जिल्हा सचिव विजय येवले, राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मनसे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, शेतकरी संघटनेचे शंकरराव गोडसे, विभागीय अधिस्वीकृती समिती सदस्य चंद्रसेन जाधव, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, दै. ऐक्य जाहिरात विभाग प्रमुख सुरेश तथा भाऊ चिंचकर, कमिन्सचे प्रविण गायकवाड, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, लायन्स, रोटरी, जायंट्स वगैरे सेवाभावी संस्था, फलटण मेडिकल फाउंडेशन, डॉक्टर्स असोसिएशन, फलटण वकील संघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर, क्रेडाई, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र, वारकरी संघटना यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी व फलटण शहर आणि तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारिता आणि राजकारण हे हातात हात घालुन चालणारे असल्याचे सांगताना अनेक स्वातंत्र्य सेनानी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु वगैरे नेत्यांची पार्श्वभूमी पत्रकारितेशी संबंध असलेली असल्याचे सांगताना पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या हेतूने तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी शेख अब्दुल्ला यांना याह्याखान यांच्याशी चर्चेसाठी पाठविले त्यावेळी त्यांच्या समवेत देशातील ८/१० पत्रकार होते, एवढी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पत्रकारांवर सोपविली जात होती, अलीकडे मात्र राजकारणात दलबदलूंची संख्या वाढत असताना पत्रकारांवरील विश्वास कमी होत असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार वसंतराव भोसले यांनी व्यक्त केली.

पूर्वी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यात त्यांच्यासोबत पत्रकार असत, आज ती प्रथा बंद करण्यात आल्याचे सांगताना पत्रकारांशिवाय अनेक बातम्या पेरायच्या, खोटा प्रचार करायचा, हा प्रचार करणारी यंत्रणा व माध्यम यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट करताना पूर्वीच्या काळी एकादा शब्द चुकला तर वाचक जाब विचारीत आता काहीही छापले तरी वाचक आम्हाला विचारीत नाहीत आणि आम्ही वाचकाला विचारीत नाही अशी खंत ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी व्यक्त केली.

वृत्तपत्रात छापून येते ते सत्य असल्याची भावना पूर्वी होती, लोकमान्य टिळक यांनी जनभावना निर्माण करण्यासाठी वृत्तपत्र उपयुक्त असल्याचे म्हटल्याची आठवण देत अलीकडे वृत्तपत्रावरील या विश्वासाची किंवा मूल्यांची घसरण होत असताना आगामी काळात नव्या पिढीने अभ्यास करुन समाजाच्या प्रश्नांची बांधीलकी स्वीकारुन पत्रकारिता करण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार वसंतराव भोसले यांनी व्यक्त केले.

बातमी देण्यापेक्षा कोणती बातमी देवू नये, कोणती बातमी द्यावी त्याचा समाजाला कितपत लाभ होईल याचा विचार करणारी अरविंद मेहता यांची ही शेवटची पिढी असल्याचे सांगत आता अपेक्षा ठेवाल तर भ्रमनिरास होईल, बातमीदारी करण्यासाठी त्या भागाचा अभ्यास असावा लागतो, इतिहास भूगोल माहिती असावा लागतो, माहिती असेल तर समाजाबरोबर राहता येते अरविंद मेहता समाजाबरोबर राहिले त्यांचे हित पाहिले चुकीचे असेल त्यावर प्रहार केला म्हणून ते यशस्वी झाले नव्या पिढीने हे सर्व अभ्यासून यशस्वी व्हावे अशी अपेक्षा वसंत भोसले यांनी व्यक्त केली.

पत्रकारितेत यशस्वी होण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी या क्षेत्रात चांगले काम करायचे असेल तर समाज जीवनाचा, येथील सार्वजनिक प्रश्नांचा शासन यंत्रणेकडून राबविणे अपेक्षित असलेल्या योजनांचा त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत नव्या पिढीने त्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन वसंत भोसले यांनी केले.

तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्य करुन राज्यभराचा अभ्यास करणे, राज्यभर नाव मिळविणे यामागे अपार कष्ट, माहिती देण्याची पद्धती आणि समाजाप्रती श्रद्धा असावी लागते ती अरविंद मेहता यांनी अपार मेहनत आणि समाजाची बांधीलकी यातून प्राप्त केल्याने त्यांना उज्वल यश प्राप्त झाल्याचे स्पष्ट करीत वसंत भोसले यांनी अरविंद मेहता यांचे कौतुक केले. या उभयतांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना केली.

उभ्या महाराष्ट्रात फलटणचे गटातटाचे राजकारण प्रख्यात होते, त्यातून तालुक्याचे किती हित साधले गेले याची जाणीव असल्याने आम्हा दोघांचा संघर्ष असला तरी त्यामध्ये कोठे थांबावे याची पूर्ण माहिती आम्हाला असल्याने या तालुक्याचे नुकसान होऊ देणार नाही, लोकशाही मानणारांना संघर्ष आवडतो पण संघर्षाला माणुसकी व सात्विकतेची जोड मिळाली तर संघर्षाचा केंद्रबिंदू आपल्यासाठी काही मिळण्यापेक्षा सर्वसामान्यांना काय देता येईल याचा असला पाहिजे हे स्पष्ट करताना प्रत्येकाला आपला विचार, आपण जपलेले आदर्श आणि महत्त्वाकांक्षा असते असे स्पष्ट प्रतिपादन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

पत्रकारांमुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि ट्रम्प यांना पायउतार व्हावे लागले, ती अपेक्षा तुमच्याकडून करणार नाही पण सद्यस्थितीवर परखडपणे लिहू शकाल असे तुम्ही एकमेव आहात त्यामुळे आमच्यासह ज्यांच्या चुका असतील किंवा ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्याबाबत आपण परखडपणे लिहावे अशी अपेक्षा केली तर ती निश्चितपणे चुकीची होणार नाही असे सांगताना महाराष्ट्राच्या विकासाला पत्रकारितेची जोड लाभली आहे अलीकडे सगळेच बदलले असल्याने या बदलाचे स्वागत करताना आपल्याला बदलावे लागेल तथापि विकासापासून आणि लोकांच्या अपेक्षांपासून दूर जाता येणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

आपली आणि अरविंद मेहता यांची दीर्घकाळाची मैत्री आहे ती अखंड रहावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अमृत महोत्सवानिमित्त उभयतांना शुभेच्छा दिल्या.

पत्रकारिता करताना अरविंद मेहता यांनी केवळ टीकात्मक लिखाण न करता समाजहिताला प्राधान्य देणारे, समाजाचे प्रश्न मांडणारे लिखाण केले, त्याचबरोबर गेली ५ दशके पत्रकारितेचा अंकुश त्यांनी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसाठी योग्य पद्धतीने वापरुन केलेल्या कामामुळे आतापर्यंत त्यांचा शब्द डावलण्याची हिंमत कोणीही दाखविली नाही. त्यांचा अभ्यास, त्यांच्याकडे असलेली माहिती आणि लिहिताना तळागाळातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी खरे लिहिण्याची त्यांची पद्धत याद्वारे त्यांनी झालेल्या कामांचे मूल्यमापन केले आणि होणाऱ्या कामांसाठी योग्य सल्ला दिल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांची दृष्टी अनुभव निश्चितपणे उपयोगात आला असून अरविंद मेहता यांचा स्वभाव स्वच्छ पाण्यासारखा आहे जेथे जातील तेथे मिसळून त्याला आपला रंग देतात आणि तेथील विकासाला, सत्याला, निष्ठेला प्राधान्य देऊन त्या घटकाचे प्रश्न सोडवितात त्यांचा सल्ला निश्चितपणाने योग्य तोच असतो त्यामुळेच त्यांची आणि आपली दृढ मैत्री असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.

सातारा जिल्ह्यातील आजच्या पराकोटीच्या राजकारणात २ निंबाळकरांना एकत्र आणण्याची क्षमता केवळ अरविंद मेहता यांच्याकडेच असल्याचे आवर्जून सांगत हे २ निंबाळकर एकत्र आले, तर जिल्ह्याचे पर्यावरण आणि राजकारण निश्चित योग्य दिशेने चालेल, त्यात जिल्ह्याचा फायदा होईल असे सांगत फलटण तालुक्यातील किंबहुना सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र ठेवून त्यांचे हित जपण्याचे काम गेली अनेक वर्षापासून अरविंद मेहता यांनी उत्तम प्रकारे केले असल्याचे तसेच संपूर्ण पुणे विभागात म्हणजे सातारा, सांगली, पुणे कोल्हापूर आणि सोलापूर या ५ ही जिल्ह्यात सर्वाधिक अधिस्वीकृती फलटण तालुक्यातील पत्रकारांना दिल्या गेल्या आहेत त्या पाठीमागे अरविंद मेहता यांची चिकाटी, मेहनत आणि त्यांनी केलेला पाठपुरावा असल्याचे पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी आवर्जून सांगितले.

आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष अव्याहत सुरु राहिला तरच त्यांच्यातील निकोप स्पर्धेतून तालुक्याचा सर्वांगीण विकास होत राहील याची ग्वाही देताना स्वातंत्र्यानंतरच्या ४०/४५ वर्षात फलटण तालुक्याच्या विकासाला आवश्यक तेवढी गती प्राप्त झाली नाही मात्र गेल्या ३० वर्षात सुरु असलेल्या अनोख्या राजकारणातून विकासाची स्पर्धा सुरु झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात पाटाचे पाणी पोहोचले, परिणामी बागायतासह उघडी बोडकी माळरानेही, हिरवीगार झाली, प्रतिदिन ५ हजार मे. टन ऊसाचे गाळप करणाऱ्या २ साखर कारखान्यांच्या जागी आज ४ साखर कारखाने उभे असून ते प्रतिदिन ३५ ते ४० हजार मे. टन उसाचे गाळप दररोज करताहेत, फलटणला रेल्वेचे स्वप्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिले गेले मात्र ते प्रत्यक्षात या कालावधीत आले, या भागातून अनेक राष्ट्रीय महामार्ग गेले ही सर्व विकास कामे या संघर्षातून झाली असल्याने हा संघर्ष तालुक्याच्या विकासासाठी अविरत सुरु राहिला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक प्राधान्याने होत राहिली पाहिजे यासाठी या दोघांना आणि तालुक्यातील सर्वसामान्यांना एकत्र आणून त्यांच्यासमोर तुम्हा/आम्हा सर्वांची ही भावना मांडण्यासाठी माझ्या अमृत महोत्सवाचे केवळ निमित्त करुन त्यांना एकत्र बोलावल्याचे अरविंद मेहता यांनी स्पष्ट केले.

आपल्या अमृत महोत्सव सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान ही संकल्पना मांडताना केवळ आपल्या एकट्याचा नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी गेल्या ४०/५० वर्षात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्याची कल्पना लक्षात घेऊन प्रातिनिधिक स्वरुपात या १२ जणांचा सन्मान करण्याचे ठरविण्यात आले होते, हा सन्मान सोहोळा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान सोहोळा असल्याचे अरविंद मेहता यांनी आवर्जून सांगितले.

प्रारंभी शिवसंदेशकार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, तर प्रा. रमेश आढाव आणि राजेंद्र भागवत या फलटण तालुक्यातील २ पत्रकारांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रा. डॉ. संजय दीक्षित यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी गौरवांकाचे संपादक या नात्याने त्याविषयी विवेचन केले, त्यानंतर सौ. तृप्ती शहा, सौ. अंजली मेहता, प्रकाश शहा, डॉ. बिपिनभई शहा, डॉ. साधना शहा यांची समायोचित भाषणे झाली.

मान्यवरांच्या हस्ते आठवणींचा अमृतसंग्रह या गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले, अमृत महोत्सव सत्कार समितीचे सचिव पत्रकार सुभाष भांबुरे यांनी लिहिलेल्या सन्मानपत्राचे वाचन आणि त्यानंतर सत्कार समितीच्यावतीने अरविंद मेहता व सौ. इंदुमती मेहता यांचा यथोचित सत्कार आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सत्कार समितीचे सदस्य पत्रकार युवराज पवार यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. पत्रकार प्रा. सतीश जंगम व पत्रकार आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले.

या समारंभातच जिल्ह्यातील ज्येष्ठ १२ पत्रकारांचा सन्मान करण्याचे ठरविण्यात आले होते, त्यामध्ये रविंद्र बेडकीहाळ फलटण, शामराव अहिवळे फलटण, सौ. विमल नलावडे कोरेगाव, नारायण शिंगटे मेढा, दत्ता मर्ढेकर वाई, शिवरतन पल्लोड महाबळेश्वर, बापूराव गुंजवटे बिजवडी, संपत देसाई पाटण, पां. प. पवार अपशिंगे, शंकर पाटील कराड, शशिकांत जाधव लोणंद, विनय भिसे खटाव यांचा समावेश होता. त्यापैकी उपस्थितांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

या समारंभात शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्यावतीने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, ७५ पेढ्यांचा हार घालून, श्री शांतिनाथ जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघाच्यावतीने भेटवस्तू, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून, जैन सोशल ग्रुप, स्वयंसिद्धा महिला संस्था समूह आणि दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने सन्मानपत्र, शाल श्रीफळ पुष्पहार घालून तसेच तालुक्यातील विविध संस्था संघटना आणि व्यक्तिगतरीत्या अनेकांनी पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देवून अरविंद मेहता व सौ. इंदूमती मेहता यांचा यथोचित सन्मान केला.

यावेळी डॉ. बी. आर. आंबेडकर इन्स्टिट्यूटचे शेखर कांबळे व सौ. मनीषा कांबळे यांनी संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली विशेष फिल्म आणि सन्मान पत्राचे केलेले सादरीकरण सर्वांनाच भावले.

पी. एन. गाडगीळ अँड सन्स, पुणे आणि पी. एम. डी. मिल्क, बारामती यांनी तयार केलेल्या सन्मान चिन्हांचे सर्वांनीच तोंड भरुन कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments