पुणे : आपल्या भारतीय संस्कृतीत महिलेचा सन्मान ही परंपरा आहे. अशा कार्यक्रमातून पुढील पिढीला देखील कळले पाहिजे की स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. महिलांवर वाढता अत्याचार पाहता आजच्या काळात याची खूप गरज आहे. नारी शक्तीला सलाम करण्याचे काम या संस्थेकडून केले जात आहे. पोलिस खात्यातील महिलांचा सन्मान केल्यामुळे त्यांना वर्षभर याची उर्जा मिळेल, असे मत पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात महिला पोलीस अधिकारी व आरटीओ अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
ॲड. प्रताप परदेशी म्हणाले, केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम या उत्सवात होतात. पूजा देवीची करतो परंतु खऱ्या स्त्री शक्तीची पूजा करून हा उत्सव साजरा केला जात आहे. पोलीस महिला अधिकारी या घरातील जबाबदारी पार पाडून त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या कार्यकाला सलाम करण्यासाठी हा सत्कार करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
नवरात्र उत्सवाचा कालावधी वर्षभरासाठी ऊर्जा देतो. या उत्सवामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि अनेक महिलांना उत्साह मिळतो, अशी भावना महिला पोलीस व महिला आरटीओ यांनी व्यक्त केली. महिला पोलीस व महिला आरटीओ अधिकाऱ्यांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली.


