Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवयवदान प्रक्रियेच्या प्रचार – प्रसाराची आवश्यकता अवयवदान प्रत्यारोपण समन्वयक आरती गोखले...

अवयवदान प्रक्रियेच्या प्रचार – प्रसाराची आवश्यकता अवयवदान प्रत्यारोपण समन्वयक आरती गोखले यांचे प्रतिपादन हिंदू महिला सभेच्या वतीने दुर्गा पुरस्कार गोखले यांना प्रदान

पुणे, दि. २७ सप्टेंबर २०२५ : अवयवदान प्रक्रियेत अवयवांचे दाते कमी आणि दान इच्छिणारे असंख्य, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अवयवदानाचा मोठ्या प्रमाणात प्रचार – प्रसार होण्याची आवश्यकता आहे. अवयवदानाची इच्छा कुटुंबियांसोबत अवश्य शेअर करावी, त्यायोगे प्रत्यक्ष दानप्रक्रिया सुलभ होईल, असे आवाहन अवयवदान प्रत्यारोपण समन्वयक आरती गोखले यांनी केले. हिंदू महिला सभेच्या वतीने सुलभा देशपांडे स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या दुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

 

ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. माया तुळपुळे यांच्या हस्ते आरती गोखले यांना यावर्षीचा दुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले उपस्थित होत्या. नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेचे उद्घाटन ‘सखी रथ’ च्या दीपाली कडू यांच्या हस्ते झाले.

 

यावेळी बोलताना आरती गोखले म्हणाल्या, “मेंदूमृत रुग्णाच्या अवयवांचे दान करता येते. त्यासाठी अशा रुग्णाच्या कुटुंबीय व नातेवाईकांचे समुपदेशन आवश्यक असते. मी हे कार्य २० वर्षांपासून करते आहे. झेडटीसीसीची प्रमुख प्रत्यारोपण समन्वयक म्हणून अवयवदानविषयक प्रशिक्षण, जनजागृती मोहिमांमध्ये माझा सहभाग होता. अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे, मात्र प्रत्यक्ष अवयवांचे दान अत्यल्प प्रमाणात होते. मानवी शरीरातील सुमारे ४६ अवयवांचे दान शक्य असते. पण रुग्णाची इच्छा आणि कुटुंबियांचे समुपदेशन आणि परवानगी, याशिवाय अवयवदान शक्य होत नाही. त्यामुळे अवयवदानाचा अधिकाधिक प्रचार – प्रसार होण्याची फार आवश्यकता आहे”. अवयवदान प्रक्रिया शासनाची आहे आणि ती अत्यंत पारदर्शक आहे, याचाही उल्लेख त्यांनी केला.

 

डॉ. माया तुळपुळे म्हणाल्या, “अवयवदान हे जिवंतपणी (रक्तदान, कीडनी) आणि मेंदूमृत, अशा दोन्ही अवस्थेत करता येते. श्रीलंकेत नेत्रदान सक्तीचे आहे, ते अन्य देशांना हे दान निर्यात करतात, हे आपण जाणून घेतले पाहिजे. जगातील अनेक देशांत अवयवदानाची चळवळ रुजली आहे. आपल्याकडे ती मोठ्या प्रमाणात रुजवण्याची गरज आहे. आम्ही स्थापन केलेल्या ‘श्वेता असोसिएशन’च्या माध्यमातून कोडाविषयीचे गैरसमज, कोडाला कलंक मानण्याची समाजाची मानसिकता आणि कोडाविषयीचे गैरसमज, दूर करण्याचा प्रयत्न केला जातो’.

 

दीपाली कडू यांनी ‘सखी रथ’ या संकल्पनेची माहिती दिली. उत्तम शिक्षण असूनही वेगळे काही करण्याची उर्मी असल्याने महिलांना ड्रायव्हिंग शिकवण्याचे कार्य या संस्थेने सुरू केले. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी, चालविण्याचे प्रशिक्षण सखी रथच्या माध्यमातून करत असल्याचे त्या म्हणाल्या. या क्षेत्रातही मनुष्यबळाची फार गरज अहे, असे त्यांनी सांगितले.

 

सुप्रिया दामले यांनीही अवयवदान ही चळवळ व्हावी आणि अवयवदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली.

 

उत्तरार्धात स्वरमयी प्रस्तुत गीतगुंजन हा सुगम संगीतातील गीत प्रकारांवर आधारित हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम राजश्री ताम्हनकर आणि सहकलाकारांनी सादर केला. वंदना जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments