Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedम्युझिअममध्ये जाऊन शिकण्याची गोडी मुलांमध्ये निर्माण करण्याची गरज - डॉ. गो. बं....

म्युझिअममध्ये जाऊन शिकण्याची गोडी मुलांमध्ये निर्माण करण्याची गरज – डॉ. गो. बं. देगलूरकर

संजय दाबके लिखित ‘म्युझिअम’ पुस्तकाचे प्रकाशन

 

पुणे, दि. ६ ऑक्टोबर, २०२५ : म्युझिअममध्ये जाऊन अनेक गोष्टी शिकता येतात. मात्र म्युझिअम पाहून शिकण्याची प्रवृत्ती आपल्याकडे नाही. विदेशात पालक मुलांना आवर्जून म्युझिअममध्ये घेऊन जातात. परंतु तसे आपल्या देशात फारसे होताना दिसत नाही. मुलांनी म्युझिअम पाहून शिकण्याची वृत्ती आपल्या देशात वाढायला हवी, असे मत डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती व मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.

 

रसिक आंतरभारती तर्फे संजय दाबके यांनी लिहिलेल्या ‘म्युझिअम’ या पुस्तकाचे प्रकाशन आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टीमध्ये संपन्न झाले. यावेळी डॉ. देगलूरकर बोलत होते. प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर, शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम, पुस्तकाचे लेखक संजय दाबके, रसिक आंतरभारतीचे संचालक शैलेश नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

सदर पुस्तकात दाबके यांनी युरोप व अमेरिकेत गेल्यावर आवर्जून भेट द्यायला पाहिजे अशा निवडक १३ म्युझिअम विषयीचे अनुभवकथन मांडलेले आहे. दाबके यांना दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांची उभारणी व व्यवस्थापन, चित्रपट, मालिका, माहितीपट व थीम पार्क निमिर्ती आदी क्षेत्रात काम करण्याच्या प्रदीर्घ अनुभव आहे.

 

आपला महाराष्ट्र हे किल्ल्यांचे एक जिवंत म्युझिअम असून गडकिल्ल्यांची इतकी विविधता इतर कुठेही पाहायला मिळत नाही असे सांगत प्रा. घाणेकर यावेळी म्हणाले की, म्युझिअम व थीम पार्क यामधील रेषा ही धूसर होत चालली आहे. पुणे शहरात ६० हून अधिक म्युझिअम आहेत. परंतु, त्याविषयी शहरातील नागरिकांनाच माहिती नसल्याच्या बाबीकडे यावेळी घाणेकर यांनी लक्ष वेधले. प्रत्येक सुट्टीत दरवर्षी पालकांनी मुलांना शहरातील कमीतकमी एक तरी म्युझिअम दाखवायला पाहिजे. तसेच, प्रत्येक म्युझिअमच्या व्यवस्थापनाने त्यांच्या म्युझिअममधील ‘टॉप फाईव्ह’ बघण्यासारख्या गोष्टींविषयी म्युझिअमला भेट देणाऱ्या नागरिकांना अवगत करायला हवे, असे मत देखील घाणेकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

 

काळाच्या तडाख्यातून ज्या गोष्टी वाचतात, त्यामधून इतिहास सांगितला जातो, त्यामधून म्युझिअम सारख्या गोष्टी उभ्या राहतात आणि इतिहासातील अनेक गोष्टी नव्या पिढीपर्यंत पोहचतात. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून म्युझिअम देखील आधुनिकतेकडे वळू लागली असल्याचे पुस्तकाचे लेखक संजय दाबके यावेळी म्हणाले.

 

शिवसृष्टीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभा करण्यात आला आहे. पुढल्या दोन वर्षांमध्ये इथे रायगडवरील राजसभा आणि १६७४ मध्ये झालेला राज्याभिषेक याचा अनुभव शिवप्रेमी मंडळींना घेता येणार असल्याचे शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी नमूद केले. ४ टप्प्यांमध्ये साकारणाऱ्या शिवसृष्टीच्या निर्मितीसाठी सुमारे ४३८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. एका दुर्लक्षित परंतु वेगळ्या विषयावरील पुस्तक तयार करण्यामागची कल्पना प्रकाशक शैलेश नांदुरकर यांनी यावेळी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

 

‘म्युझिअम’ या पुस्तकाविषयी –

‘म्युझिअम’ या पुस्तकाच्या ५०० हून अधिक प्रतींची प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी झालेली आहे. हे पुस्तक वाचकांना प्रवासात देखील सहज घेवून जाता येऊ शकते. वजनाला हलके असणारे हे पुस्तक २१२ पानी असून हार्ड बाउंड आहे. पुस्तकातून लेखक संजय दाबके यांनी ‘आखो देखा’ म्युझिअमचा वृत्तांत सांगितला आहे. युरोप खंडातील १३ म्युझिअमची सैर रंगीत छायाचित्रांसह हे पुस्तक घडवते. शेवटच्या प्रकरणात पुण्यातील शिवसृष्टीच्या निर्मितीचं अनुभवकथन लेखक संजय दाबके यांनी नोंदवले असून ⁠आवर्जून संग्राह्य ठेवावे असे ‘म्युझिअम’

हे पुस्तक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments