Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुवा कलाकारांच्या प्रतिभा आविष्कारांची 'अमृतवर्षा' 'आसमंत' प्रस्तुत रंगली रात्रीच्या रागांची...

युवा कलाकारांच्या प्रतिभा आविष्कारांची ‘अमृतवर्षा’ ‘आसमंत’ प्रस्तुत रंगली रात्रीच्या रागांची स्वरयात्रा

पुणे, दि. ६ ऑक्टोबर, २०२५ – ललित कलांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण असणाऱ्या परंपरा आणि वारसा, या दोन्ही घटकांची धुरा युवा पिढीच्या कलाकारांनी जबाबदारीने पेलली आहे, याचा प्रत्यय ‘आसमंत’ प्रस्तुत ‘अमृतवर्षा’ या विशेष मैफिलींच्या सत्रात रसिकांनी घेतला. घराण्याची शिस्त, गुरुंची तालीम आणि स्वप्रतिभेला प्रयोगशीलतेचे कोंदण देत, तरुण कलाकारांनी अतिशय दर्जेदार सादरीकरणाने रसिकांना आनंद दिला.

 

गायन, वादन या ललित कला चढत्या रात्रीसोबत खुलत जातात, हा प्रघात आधुनिक काळातील न्यायालयीन आदेशामुळे खंडित झाला आणि रात्रसमयीचे राग प्रस्तुतीकरण दुर्मिळ झाले. या पार्श्वभूमीवर, आसमंत प्रस्तुत रात्रीच्या रागांच्या मैफिलींचे सादरीकरण ही रसिकांसाठीही दुर्मिळ संधी ठरली. सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरात सायंकाळी ६ ते पहाटे ६, असे सलग १२ तास, रसिक रात्रसमयीच्या रागश्रवणात गुंतून गेले होते.

 

नागेश आडगांवकर यांनी सायंकालीन वातावरणात गायिलेल्या राग मारवामधील ‘पिया मोरे आ देस’ आणि ‘सुन सुन बतिया सगरी’, या रचनांनी अमृतवर्षा मैफलसत्राची सुरवात झाली. त्यानंतर रागेश्री वैरागकर यांनी राग गोरख कल्याणमध्ये ‘ये कर ता’ आणि ‘पिया न लागे मनवा’, या बंदिशी सादर केल्या. संगीत मिश्रा यांनी सारंगीवर आलाप, जोड, झाला या क्रमाने राग वाचस्पती रंगवला. आदित्य मोडक यांनी ‘संपूर्ण मालकंस’मध्ये ‘बरज रही’ आणि ‘गीत ढूंडन जा’ ही पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांची रचना पेश केली. पाठोपाठ मीनल दातार यांनी राग नंदमधील ‘ढूंढू बारे सैया’ आणि ‘आजा राजन अब तो आजा’ या रचना सादर केल्या. धनाश्री घैसास यांनी ‘कौन गत भयी’, ‘येरी माई साजन नही आये’ आणि ‘झगरा करत पकरलिनी बैया मरोरी’ अशा तीन बंदिशींमधून राग बागेश्री मांडला.

 

केदार केळकर यांनी ‘सुघर बरपा’ आणि ‘पीड पराई’ या बंदिशींच्या माध्यमातून राग जोगकंस उलगडला. अंकिता जोशी यांचा दरबारी कानडा ‘जय जय दुर्गे’ आणि ‘हर हर भूतनाथ’, या रचनांमधून साकारला. अनुप कुलथे यांनी व्हायोलिनवर आलाप, जोड, झाला यांतून राग जोग उभा केला. मेहर परळीकर यांनी रामप्रहरी राग भटियारची मांडणी ‘उचट गयी’ आणि ‘पिया मिलन’ या रचनांच्या रूपाने केली. आदित्य खांडवे यांनी राग ललतच्या सादरीकरणासाठी ‘लागी रैन’ आणि ‘देना देना…’ या रचनांची निवड केली होती. अमृतवर्षा या अनोख्या मैफलसत्राची सांगता विदुषी पौर्णिमा धुमाळे यांच्या सुरेल गायनाने सकाळी ६ च्या सुमारास झाली. दुर्गा भैरव रागात त्यांनी ‘करम तू जान’ आणि ‘लागो ध्यान सप्तसूरनपर’, या रचनांतून पहाटेच्या शुचिर्भूत वातावरणाची प्रचीती दिली.

 

या सर्व गायक – वादक कलाकारांना तबल्याची दमदार साथ ऋषिकेश जगताप, अभिजीत बारटक्के आणि रामकृष्ण करंबेळकर यांनी केली. तसेच संवादिनीची साथ नीलय साळवी, हर्षल काटदरे आणि सुधांशु घारपुरे या कलाकारांनी करून, गायन – वादनाचा आनंद द्विगुणित केला. उस्ताद फैयाज हुसैन खान, पंडित उदय भवाळकर, अच्युत गोडबोले अशा मान्यवरांनी उपस्थित राहून युवा कलाकारांचे आणि या उपक्रमाचे कौतुक केले.

 

‘आसमंत’चे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. “आसमंत शास्त्रीय संगीताच्या प्रचार प्रसाराचे काम अनेक वर्षापासून काम करत आहे. संगीत क्षणाक्षणाला आनंदाची निर्मिती करत अंतःकरणात सुसंवाद निर्माण करते. आपल्या अस्तित्वाच्या गाभ्याशी आपले नाते घट्ट करते. शास्त्रीय संगीत ऐकण्याचा अनुभव ध्यानासारखाच विश्वाच्या निर्मात्याच्या सानिध्यात नेणारा असतो. आसमंत हा सामाजिक उपक्रम मुलं, शास्त्रीय संगीत, निसर्ग आणि पर्यावरण या तिघांचा सुंदर संगम घडवून एका चांगल्या, सुसंवादपूर्ण, विश्वनिर्मितीचा प्रयत्न करत आहे. आसमंतचे जौवविविधता उद्यान आणि सागर महोत्सव हे दोन अग्रगण्य प्रकल्प रसिकमान्य आहेत”, असे ते म्हणाले. आसमंतचे संचालक नितिन करमरकर, पुरुषोत्तम पेंडसे, आणि संजय खेर यावेळी उपस्थित होते. दुहिता सोमण खेर आणि ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमा दरम्यान शास्त्रीय गायन क्षेत्रात गेली काही वर्ष उत्तम योगदाना बद्दल हेमंत नावडीकर, पुणे आणि मनोहर व श्रीनिवास जोशी, खलवायन संस्था रत्नागिरी यांचे सत्कार करण्या

त आले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments