पिंपरी, ९ ऑक्टोबर २०२५ : मराठी अभिमानाचा रंग, मृदंग-झांजांचा ताल आणि संस्कृतीचा स्पंदनशील स्वर… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’मध्ये सादर झालेल्या मराठी संस्कृतीचा साज चढवणारा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा करण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’मध्ये ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
आमदार उमा खापरे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, पोलीस उपायुक्त बापू बांगर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, माजी नगरसेवक केशव घोळवे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
उठी उठी गोपाळा… या भूपाळीने कार्यक्रमाचा पडदा उघडला आणि क्षणातच सभागृह भक्तिरसाने दरवळले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्या अभंगांच्या गजराने वातावरण पवित्र झाले.
यानंतर सादर झालेल्या मुरळी, भारूड, जागरण, गोंधळ, कोळीनृत्य, वारकरी दिंडी, धनगरी गीत, कोकणी गाणी, ठाकरी गीत, भजन, गवळणी, पोवाडे आणि लावणी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती रंगमंचावर जिवंत झाली. गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी…, भलगडी दादा भलं रं…, वल्लव रे नाकवा वल्लव…, मराठी पाऊल पडते पुढे… अशी एकाहून एक गाणी रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाट्यसादरीकरणाने या कार्यक्रमाला एक वेगळे वैभव लाभले. हे हिंदवी स्वराज व्हावे, ही तर श्रीची इच्छा… या वाक्याला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय!”, “जय भवानी! जय शिवाजी!” अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले. ग्रामीण भागातील संस्कृती, मराठी संस्कृतीमधील सण-उत्सवांचे सादरीकरण कलाकारांनी करतानाच रंगमंचावरील नेपथ्याने महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन रसिकांना घडवले. तबला, झांज, हलगी, मृदुंग यांच्या तालावर प्रेक्षकही थिरकले.
‘मराठी बाणा’ कार्यक्रमाचे निर्माते-दिग्दर्शक अशोक हांडे यांच्यासह १२५ हून अधिक कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाने एकप्रकारे ‘मराठी असणे हीच खरी ओळख’ हा संदेश रसिकांच्या अंतःकरणात रुजवला. हा कार्यक्रम फक्त सांस्कृतिक नव्हे, तर मातृभाषेचा महोत्सव, लोककलेचा उत्सव आणि मराठी अस्मि
तेचा जयघोष ठरला.