पुणे ः देशासाठी रक्त सांडणाऱ्या, शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करत आयुष्यभरासाठी जखमा झालेल्या वीर सैनिकांसमोर पुणेकरांनी कृतज्ञतेने मस्तक झुकवले. चाकांवरून जीवनाचा प्रवास करणाऱ्या या शूरवीरांना बहिणींनी औक्षण करून, प्रेमाने पेढ्याचा घास भरवला आणि ‘आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत’ असा आश्वासक संदेश दिला. त्या क्षणी वातावरण भारावून गेले आणि उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
निमित्त होते, सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसाठी आयोजित भाऊबीज या कार्यक्रमाचे. यावेळी ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, सिंधूताई सपकाळ यांच्या कन्या समाजसेविका ममता सपकाळ, केंद्राचे प्रमुख डॉ. पी. आर. मुखर्जी, कर्नल बी.एल.भार्गव, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, गिरीश पोटफोडे आदी उपस्थित होते.
आशा खाडिलकर म्हणाल्या, भारतमातेच्या सेवेसाठी आपल्या पुत्राला सीमेवर पाठवणाऱ्या मातेला माझा सलाम. दुसरा सलाम तुमच्या पत्नीला करते कारण आपला मुलगा आपला पती देशासाठी समर्पित करणे ही खूप मोठी गोष्टी आहे. सैनिकांकधीच आपली मुले मोठी होताना पाहता येत नाही. सैनिकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. ती इच्छा मी माझा गायनातून पूर्ण केली असेही त्यांनी सांगितले.
पी.आर.मुखर्जी म्हणाले, अपंगत्व आले तरीही प्रत्येक सैनिकांमधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. अपंगत्व आल्यानंतर देखील देशसेवेसाठी ते कुठेही कमी पडत नाहीत ही त्यांची इच्छाशक्ती इतरांना प्ररेणा देत असते. सैनिकांसमवेत सण उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोेबल वाढतेच परंतु त्यांच्याकडे पाहून इतरांना देखील प्रेरणा मिळते असेही त्यांनी सांगितले.
आनंद सराफ म्हणाले, केंद्रामध्ये वयवर्षे २२ ते ८४ वर्षांचे जवान आहेत. या जवानांना आरोग्य सुरक्षा आणि रोजगार प्रशिक्षण मिळवून देण्यासोबतच त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न असतो. आपल्या सण-उत्सवांच्या माध्यमातून जवानांना आनंद देत, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास त्यांना देण्याकरिता उपक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाते. दिव्यांग सैनिकांना समाजासोबत जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाती कोटलीकर, स्मिता जोशी, कल्याणी सराफ, सरस्वती शेंडगे, उमा ताटके, वृषाली नलवडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
——-


