Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत...

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत ॲडम वॉल्टन व व्हॅलेंटिन व्हॅचेरोट यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे, 24 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या एकेरीत उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ॲडम वॉल्टन, मोनॅकोच्या व्हॅलेंटिन व्हॅचेरोट यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित ॲडम वॉल्टन याने दुसऱ्या मानांकित क्रोएशियाच्या दुजे अजदुकोविकचा टायब्रेकमध्ये 7-5, 7-6(6) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1 तास 48 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला. सामन्यात दहाव्या गेमपर्यंत 5-5 अशी बरोबरी होती. त्यानंतर ॲडमने दुजेची बाराव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 7-5 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये देखील दोन्ही खेळाडूंकडून चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. बाराव्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये ॲडमने आपल्या बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळाच्या जोरावर हा सेट 7-6(6) असा जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. जागतिक क्रमवारीत 154व्या स्थानी असलेल्या ॲडमयाने याआधी बर्नी चॅलेंजर स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. तसेच मागील दोन आठवड्यापूर्वी झालेल्या बेंगळुरू चॅलेंजर स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत मोनॅकोच्या चौथ्या मानांकित व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याने ऑस्ट्रेलियाच्या सातव्या मानांकित डॅनी स्विनीचा 4-6, 6-2, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1तास 50मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी असताना डॅनीने आक्रमक खेळ करत व्हॅलेंटिनची नवव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या व्हॅलेंटिनने जोरदार पुनरागमन करत चौथ्या, सहाव्या गेममध्ये डॅनीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा सहज जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला दोंघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे 2-2 अशी बरोबरी निर्माण झाली. पाचव्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी पाहायला मिळाली. या सेटमध्ये 40-40असे समान गुण असताना व्हॅलेंटिनने दोन बिनतोड सर्व्हिस केल्या व स्वतःची सर्व्हिस राखत 3-2 अशी आघाडी घेतली. विशेष म्हणजे या सेटमध्ये पाच ड्यूस झाले. त्यानंतर दहाव्या गेममध्ये व्हॅलेंटिन 5-4 अशा फरकाने आघाडीवर असताना त्याने डॅनीची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4 असा जिंकून अंतिम फेरी गाठली. व्हॅलेंटिन याने वर्षाच्या सुरुवातीलाच सलग दोन एटीपी चॅलेंजर स्पर्धेत विजेतेपद पटकविले आहे.

पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी:
व्हॅलेंटिन व्हॅचेरोट(मॉन) [4] वि.वि. डॅनी स्विनी (ऑस्ट्रेलिया) [7] 4-6, 6-2, 6-4;
ॲडम वॉल्टन(ऑस्ट्रेलिया) [3] वि.वि.दुजे अजदुकोविक (क्रोएशिया)(2)7-5, 7-6(6);

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments