स्व. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांना महोत्सवाद्वारे अर्पण करण्यात येणार आदरांजली
गुरुवर्य पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पारिजात फुलला’ या लघुपटाचे महोत्सवादरम्यान प्रदर्शन व लोकार्पण
पुणे, दि. २५ नोव्हेंबर, २०२५ : ख्यातनाम गायिका, संगीतकार डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक अतुल खांडेकर यांच्या सूर महती फाउंडेशनच्या वतीने शनिवार दि. २९ आणि रविवार दि. ३० नोव्हेंबर दरम्यान सूर महती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा अतुल खांडेकर व भक्ती खांडेकर यांनी केली. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून शनिवारी सायं. ५ ते रात्री १० तर रविवारी दुपारी ४.३० ते रात्री १० या वेळेत स्वारगेट येथील नेहरू स्टेडीयम शेजारील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सव संपन्न होईल, अशी माहितीही खांडेकर यांनी दिली.
सूर महती महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठीच्या विनामूल्य प्रवेशिका या २२ नोव्हेंबर, २०२५ पासून कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर, नारायण पेठ येथील पुणे मराठी ग्रंथालय आणि टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ या ठिकाणी उपलब्ध आहेत याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


