पुणे, दि. ४ डिसेंबर, २०२५ : उपशास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदानासाठी पुण्यातील सूर महती फाउंडेशनच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या सूर महती महोत्सवात डॉ. संजीव शेंडे यांचा विशेष सन्मान करीत त्यांना गौरविण्यात आले. याबरोबरच मोठ्या प्रमाणात गोसेवा करणाऱ्यासाठी सुरभी सेवा परिवाराच्या अशोक पारीख यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते डॉ. शेंडे आणि पारीख यांना गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते. डॉ. हरी सहस्रबुद्धे, सूर महती फाउंडेशनचे अतुल खांडेकर व भक्ती खांडेकर यावेळी उपस्थित होते.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना पं. अजय पोहनकर यांनी डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या आठवणींना उजाळा दिला. घराणं म्हणजे एखाद्या स्टॅम्प सारखं असतं त्यामुळे प्रत्येक कलाकाराने स्वत:ची शैली विकसित करायला हवी, असा सल्लाही पं. पोहनकर यांनी युवा कलाकारांना दिला.
डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांना आदरांजली म्हणून आयोजित करण्यात आलेल्या सूर महती महोत्सवात झालेला सन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा असून डॉ. शेंडे यांनीही डॉ. वीणा सहस्रबुद्धे आणि खांडेकर कुटुंबीय यांप्रती असलेला आदर व्यक्त केला. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या कडक तालीमीत माझी मुलगी सावनी शेंडे तयार झाली असेही ते यावेळी म्हणाले. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे या विश्वविख्यात गायिका होत्या पण त्यांनी कायम मला लहान भावाप्रमाणे वागविले अशी आठवण देखील डॉ. शेंडे यांनी सांगितली. अशोक पारीख यांनी सुरभी सेवा परिवाराच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन स्वानंद पटवर्धन यांनी के
ले.


