देशातील पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३९ वे वर्ष साजरे करत असून, यंदा रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता ४२.१९५ किमी च्या महिला–पुरुष पूर्ण मॅरेथॉन चा प्रारंभ सणस मैदानाजवळील हॉटेल कल्पना–विश्व येथून होईल. तसेच येथूनच महिला–पुरुष अर्ध मॅरेथॉन दहा किमी, पाच किमी व व्हीलचेअर स्पर्धांचा प्रारंभ होईल. यामध्ये केनिया, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, श्रीलंका येथील ७० हून अधिक परदेशी खेळाडूंसह एकूण ११ गटांत सुमारे १५००० हून अधिक धावपटू या स्पर्धेत भाग घेतील. याचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता सणस मैदान येथे संपन्न होईल. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. मेधा कुलकर्णी, आमदार बापू पठारे, पासपोर्ट अधिकारी विनोद गायकवाड, शिक्षणतज्ञ अबेदा इनामदार व प्रवीण मसालेवाले ग्रुपचे विशाल चोरडिया उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे. पुणे महानगर पालिकेतर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी परदेशी खेळाडू पुण्यास यायला सुरुवात झाली असून शनिवार दुपारपर्यंत परदेशातील व अन्य राज्यातील खेळाडू पुण्यात पोचतील. शुक्रवारी सायंकाळी इथिओपिया सह काही परदेशी खेळाडूंनी मॅरेथॉन भवन येथे सराव केला.
रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी पहाटे ३:०० वाजता सणस मैदान येथील हॉटेल कल्पना-विश्व चौकातून ४२.१९५ किलोमीटरच्या पुरुष व महिला पूर्ण मॅरेथॉनला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येईल. तसेच पहाटे ३: ३० वाजता पुरुष-महिला (२१.०९५) अर्ध मॅरेथॉन, १० कि.मी.सकाळी ६:३० वाजता, ५ कि.मी. सकाळी ७:०० वाजता आणि सकाळी ७:१५ वाजता व्हील चेअर ३ कि.मी या स्पर्धांना सुरुवात होईल.
पुरुष व महिला पूर्ण मॅरेथॉन यंदा नव्या मार्गाने जाईल. सणस मैदानासमोरील हॉटेल कल्पना-विश्व चौक येथून निघून सणस चौक – बाजीराव रस्ता – नगरकर तालीम – लक्ष्मी रोड – कुलकर्णी पेट्रोल पंप तेथून फिरून शनिवार वाडा – शिवाजी पूल – मनपा भवन – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – डेक्कन जिमखाना – संभाजी महाराज पुतळा – खंडूजी बाबा चौक – कर्वे रस्ता – कर्वे पुतळा – डावीकडे वळून इराणी कॅफे – करिश्मा बिल्डींग – म्हात्रे पूल येथे वळून मेहेंदळे गॅरेज – डी पी रोड – जोशी किचन – पंडित फार्म –राजाराम पूल – सिंहगड रोड – डावीकडून नवशा मारुती – पु ल देशपांडे उद्यान – पानमळा – दांडेकर पूल – पर्वती पायथा – महालक्ष्मी चौक – सारसबाग – सणस पुतळा येथून डावीकडे हॉटेल कल्पना-विश्व हा २१.०९५ किमीचा पहिला टप्पा पूर्ण करून तेथूनच दुसरा टप्पा सणस पुतळा – महालक्ष्मी चौक – स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्या समोरून, खंडोबा मंदिराहून दांडेकर चौक तेथून सरळ सिंहगड मार्गे, गणेश मळा, राजाराम पूल संतोष हॉल, गोयल गंगा चौक, धायरी पुलावरून, नांदेड सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊन डिस्टेंशन सेंटर येथे सर्कलला गोल वळसा घेऊन परत त्याच मार्गे सणस मैदान येथे परत येईल व ४२.१९५ ची पूर्ण मॅरेथॉन सणस मैदानात पूर्ण होईल.
तसेच पुरुष व महिला अर्ध मॅरेथॉन स्पर्धा हॉटेल कल्पना-विश्व चौक येथून निघून सणस पुतळा – बाजीराव रस्ता – नगरकर तालीम – लक्ष्मी रोड – कुलकर्णी पेट्रोल पंप तेथून फिरून शनिवार वाडा – शिवाजी पूल – मनपा भवन – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – डेक्कन जिमखाना – संभाजी महाराज पुतळा – खंडूजी बाबा चौक – कर्वे रस्ता – कर्वे पुतळा – डावीकडे वळून इराणी कॅफे – करिश्मा बिल्डींग – म्हात्रे पूल येथे वळून मेहेंदळे गॅरेज – डी पी रोड – जोशी किचन – पंडित फार्म –राजाराम पूल – सिंहगड रोड – डावीकडून नवशा मारुती – पु ल देशपांडे उद्यान – पानमळा – दांडेकर पूल – पर्वती पायथा – महालक्ष्मी चौक – सारसबाग – सणस पुतळा येथून डावीकडे हॉटेल कल्पना-विश्व या मार्गे एक फेरी पूर्ण करून सणस मैदान येथे २१ किलोमीटरचा टप्पा पार करून स्पर्धा संपेल. याशिवाय १० किलोमीटर हॉटेल कल्पना-विश्व येथून निघून महालक्ष्मी चौक – सावरकर पुतळा – सिंहगड रोडवरील संतोष हॉल समोरून वळसा घालून परत सणस मैदान येथे पूर्ण होईल. ५ किलोमीटर ही त्याच मार्गे गणेश मळा चौकापर्यंत जाऊन वळसा घालून परत सणस मैदान येथे पूर्ण होईल. तसेच पुरुष व महिला व्हीलचेअर ३ किलोमीटर ही दांडेकर पूल चौकातून वळसा घेऊन परत सणस मैदान येथे समाप्त होईल.
यंदा गतविजेती खेळाडू ज्योती गवते, २०२३ सालचा द्वितीय क्रमांकाचा विजेता केनियाचा सायमन मवॉगी धावपटू शिवाय सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ASI), बॉम्बे सॅपर्स, एसआरपीएफ, एनडीए, येथील अव्वल दर्जाचे धावपटू सहभागी होत आहेत.
या मॅरेथॉन साठी वैद्यकीय पथकांची सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली असून सोसायटी ऑफ इमर्जन्सी मेडीसिंसचे डॉ. राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली ८० डॉक्टर्स व ३०० वैद्यकीय परिचारक व फिजिओ यामध्ये काम करतील. सणस मैदानावर एक छोटे २५ बेडचे मिनी हॉस्पिटल उभाण्यात आले आहे. ही कमिटी मॅरेथॉन रूट वर प्रत्येक किमी वर बूथ उभारून या सेवा पुरवितील. १०८ च्या अॅम्ब्युलन्स या साठी मार्गावर आणि प्रारंभ आणि रेस समाप्तीच्या ठिकाणी असतील.
सणस मैदान आणि संपूर्ण मार्गावर प्रत्येक किमी वर पिण्याचे पाणी, एक डॉक्टर आणि ३ नर्सिंग स्टाफ, १ अॅम्ब्युलन्स यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक २.५ किमी वर, फिडींग बूथ, एनर्जी ड्रिंक, फळे, स्पंजिंग (वॉटर बूथ) आणि इतर सर्व व्यवस्था “वर्ल्ड अॅथलेटिक्स” आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघ, नवी दिल्ली यांच्या नियमांनुसार आणि अटींनुसार करण्यात आली आहे.
भारती नर्सिंग कॉलेज, संचेती फिजिओ कॉलेज, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ,नवले हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, विश्वराज नर्सिंग कॉलेज, आरोग्यम वैद्यकीय पथक, नवी मुंबई यांची पथके यांचा समावेश यात आहे.
पॉवरफुल अल्ट्रा रनर्स, अहिल्यानगर रनर्स क्लब, बाणेर बालेवाडी रनर्स, सिंधू रनर्स, युनायटेड एंड्यूरोस, रनिंग पंटर्स, पीसीएमसी रनर्स – वाकड अँड पिंपळे सौदागर, नांदेड सिटी रनर्स, बावधन ब्रिज, पीसीएमसी रनर्स – चिंचवड, पीसीएमसी रनर्स – निगडी, एसपीजे स्पोर्ट्स क्लब अँड अॅकेडमी, फीट कव्हर ३६०, विश्व रनर्स, पुणे युनिवर्सिटी रनर्स, कोथरूड डेक्कन रनर्स, एबीसी रनर्स आदि पुण्यातील १७ हौशी धावपटू संस्थांनी प्रत्येक किमी वरील हायड्रेशन पॉईंट्स चे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेतली आहे. यांचे धावपटू रेसेस मध्ये भाग घेऊन स्पर्धेच्या यशात सुध्दा हातभार लावतील.
गेली चार वर्षे सायकल पायलटींग व्यवस्था संपूर्ण मार्गावर ,शर्यत संपेपर्यंत, “सायक्लोहोलिक्स” पुणे संस्थेचे ५० सायकल पायलटस अॅड. सम्राट रावते यांचे नेतृत्वा खाली करतात. यावर्षी सुध्दा त्यांचे पथक येत आहे. पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे १० मोटर सायकल पायलट धावपटुंना मार्गदर्शक म्हणून स्पर्धे पुढे नियमा नुसार असतील.
याशिवाय पुणे पोलीस व वाहतूक पोलीस यांचा चोख बंदोबस्त स्पर्धा मार्गावर राहणार असून पुणे महानगर पालिकेतर्फे संपूर्ण मार्गावर पुरेशी उजेड व्यवस्था करण्यात आलेली आहे.
स्पर्धा समाप्तीनंतर सर्व स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना सणस मैदान येथे पूर्णत्त्व पदक (फिनिशर मेडल), चहा-पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात येणार आहे.
क्रीडाप्रेमी पुणेकरांनी स्पर्धेच्या वेळी स्पर्धा मार्गात सर्व स्पर्धक खेळाडूंचे जोरदार स्वागत करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


