Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंकष्टी चतुर्थीला 'दगडूशेठ' गणपतीला पालेभाज्यांची आरास*

संकष्टी चतुर्थीला ‘दगडूशेठ’ गणपतीला पालेभाज्यांची आरास*

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला संकष्टी चतुर्थी निमित्त हरित संदेश देणारी अनोखी आरास साकारली. तब्बल २१ प्रकारच्या ताज्या व आकर्षक भाज्यांचा नैवेद्य बाप्पाला दाखविण्यात आला. पहाटे स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केल्यानंतर लाडक्या बाप्पाला महाअभिषेक आणि गणेशयाग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील मंदिरात करण्यात आले होते.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी डॉ. सुनील काळे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांसह ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गायिका कृपा किरण नाईक व सहकाऱ्यांनी पहाटे स्वराभिषेक सादर केला.

 

मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल व पांढरा मुळा, अंबाडी, पुदिना, कांदापात, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा अशा विविध भाज्या मांडण्यात आल्या होत्या. तब्बल २ हजार गड्ड्यांमधून साकारलेली ही आरास पाहण्यासाठी व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती.

 

मार्केट यार्डातील फळभाज्या आणि पालेभाज्यांचे अडतदार राजेंद्र सूर्यवंशी यांनी सजावट केली. यासाठी प्रकाश ढमढेरे, नितीन जामगे यांचे सहकार्य लाभले. तर सरपाले बंधू यांनी आरास तयार करण्यासाठी मदत केली. वर्षभर कष्ट करून शेतकरी तयार करीत असलेल्या पालेभाज्या बाप्पाच्या चरणी अर्पण झाल्याने ‘शेतकरी सुखी राहो’ अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments