पुणे, दि. १० डिसेंबर, २०२५ :परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानातील सवाई गंधर्वांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करीत ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज सुरुवात झाली. दरवर्षी सवाई गंधर्व यांचे कुटुंबीय आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे कुटुंबीय तसेच आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त एकत्र येत सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला हार घालत अभिवादन करत असतात. गेली ५१ हून अधिक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. आज या प्रसंगी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, विश्वस्त शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद, पं उपेंद्र भट, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, पद्मा देशपांडे, आनंद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.


