पुणे,10 डिसेंबर 2025 : एका आठ वर्षीय लहान मुलीने मेंनिंजोएन्सेफलायटिस (मेंदूज्वर) असलेल्या या गंभीर परिस्थितीवर मात करत सामान्य जीवन जगत आहे. नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर पुणे येथील डॉक्टरांच्या टीमने जीवाला धोका असलेल्या व गंभीर लक्षणे असलेल्या परिस्थितीवर यशस्वी उपचार केले.
मेंनिंजोएन्सेफलायटिस या स्थितीमध्ये मेंदूच्या आवरणाला आणि पाठीच्या कण्याला झाकणाऱ्या पातळ आवरणांना सूज येते. ही परिस्थिती जीवाला धोका निर्माण करणारी असते आणि यावर उपचार हे अत्यंत महत्त्वाचे असतात.लक्षणांमध्ये ताप येणे,मान ताठ होणे,प्रकाशाप्रती संवेदनशीलता वाढणे,मेंदूविषयक समस्या, झटके येणे आदीचा समावेश असतो.यावरील उपचार हे या स्थितीला कारणीभूत घटक आणि त्याची तीव्रता यावर अवलंबून असतात.
याबाबत अधिक माहिती देताना नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर पुणेचे वरिष्ठ बालरोगतज्ञ आणि नवजात शिशू तज्ञ डॉ.जलील मुजावर म्हणाले की, पुण्याच्या ग्रामीण परिसरातील एका शेतकरी कुटुंबातील आठ वर्षांच्या मुलीला गेल्या महिन्यात आमच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यावेळेस ती बेशुध्द अवस्थेत होती,ताप होता व झटक्याचा त्रास होत होता. ही एक गंभीर अवस्था असल्याने अशा स्थितीत वैद्यकीय टीमला त्वरित उपचार करणे गरजेचे असते.निदानामध्ये शारीरिक तपासणी,इमेजिंगसह सेरेब्रोस्पाईनल फ्लुईडचा नमुना घेण्यात आला.
या प्रक्रियेमध्ये स्पायनल फ्लुईड (स्पाईनल टॅप – लंबर पंक्चर) तपासण्यासाठी पाठीच्या खालच्या भागात एका सुईच्या माध्यमाने सेरेब्रोस्पायनल फ्लुईड (सीएसएफ) नमुना घेतला जातो. जीवाणू किंवा असामान्य पेशी तसेच पांढऱ्या रक्त पेशींचे प्रकार व प्रमाण,प्रथिनांचे प्रकार आणि पातळी तपासण्यासाठी प्रयोगशाळेत द्रव नमुना पाठवला जातो.
डॉ.मुजावर म्हणाले की,तिची अवस्था आधीच गंभीर झाली होती,तसेच एमआरआय अहवालात मेंदूला झालेली मोठ्या प्रमाणावरची हानी स्पष्ट दिसून आली. मेंदूचे मोठ्या प्रमाणात झालेल्या हानीमुळे वेगवेगळ्या मज्जातंतू बिंदूंवर त्याचा परिणाम होऊ लागला होता. या मुलीला चार दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि त्यानंतर ट्रॅकिओस्टोमी प्रक्रिया करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे अचूक आणि जलद निदान हे अत्यंत महत्त्वाचे असते. निदान झाल्यावर आम्ही अँटिबायोटिक्स,अँटी-व्हायरल आणि अँटी कन्व्हल्शन औषधे सुरू केली.
या सर्व उपचारांमध्ये नोबल हॉस्पिटलमधील एक बहुविद्याशाखीय डॉक्टरांची टीम कार्यरत होती.कान-नाक-घसा तज्ञ डॉ.नुदरत कमल, बालमेंदूरोगतज्ञ डॉ.संदीप पाटील, संसर्गरोग तज्ञ डॉ.अमित द्रविड,वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ.पी.डी.पोटे यांचे सांघिक कार्य,सहाय्यक कर्मचाऱ्यांचे योगदान आणि पालकांचा सकारात्मक दृष्टीकोन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही आठ वर्षांची मुलगी अत्यंत आव्हानात्मक अवस्थेतून बाहेर पडू शकली.
डॉ.मुजावर म्हणाले की, तीव्र मेंदूज्वर परिस्थितीतून बाहेर आलेल्या रूग्णांमध्ये हायपरटोनिया ही स्थिती उद्भवू शकते.या स्थितीत स्नायू कडक झाल्यामुळे हालचाल करणे अवघड होऊ शकते.मात्र या बाबतीत मुलीला अशी कोणतीही गुंतागुंत झाली नाही. अवघ्या पाच दिवसांत ती चालायला लागली.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त ,रूग्णाने उपचारांना दिलेला उत्तम प्रतिसाद आणि कुटुंबियांचे सहकार्य या दोन्ही गोष्टी सकारात्मक परिणाम मिळविण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. प्रगत वैद्यकीय उपचार,कुशल आणि अनुभवी वैद्यकीय टीम,तसेच रूग्ण अणि त्यांच्या कुटुंबाची दृढ इच्छाशक्ती या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे उपचार यशस्वी होऊन रूग्णाचा बरे होण्याचे प्रवास अधिक परिणामकारक ठरू शकतो,हे यातून प्र
तिबिंबित होते.


